लाहोर :- पाकिस्तानात आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) गटाला निर्विवाद बहुमत मिळण्याचा विश्वास पक्षाच्या नवनियुक्त उपाध्यक्षा मरियम नवाझ यांनी व्यक्त केला आहे.
मरियम नवाझ यांचे वडील आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे लंडनवरून परत येऊन निवडणूक प्रचारामध्ये “पीएमएल-एन’ पक्षाचे नेतृत्व करण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. निवडणुकीनंतर “पीएमएल-एन’ पक्ष परिणामकारक संसदीय दल म्हणून उदयाला येईल. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळून प्रचाराला सुरुवात करावी, असेही मरियम म्हणाल्या.
पक्षाचे वरिष्ठ नेते लंडनमध्ये जाऊन नवाझ शरीफ यांची भेट घेणार आहेत. यावेळी निवडणुकांच्या संभाव्य तारखा आणि पाकिस्तानातील राजकीय वस्तुस्थितीबाबत चर्चा केली जाण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तानच्या विद्यमान संसदेची मुदत यावर्षी 12 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
दरम्यान, संसदेतील कोणाही नेत्याला आजीवन अपात्र ठरवता येणार नाही, अशा आशयाचे एक विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात आले आहे. नवाझ शरीफ यांना लंडनवरून परत आणून निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी हे विधेयक मंजूर केले गेले असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते आहे.
नवाझ शरीफ यांना 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय पिठाने अपात्र ठरवले होते. तर कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास त्यांना अपात्र ठरवण्याचा निकालही सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिला आहे.