गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावूक

नवी दिल्ली – राज्यसभेत आज काश्‍मीरमधील कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासह एकूण चार राज्यसभा सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यसभेत झालेल्या कामकाजाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुलामनबी आझाद यांच्यावर बोलताना अश्रु अनावर झाले. त्यामुळे सारे सभागृह भावूक झालेले दिसून आले.

गुलामनबी आझाद यांनी संसदेत आणि राजकारणात दिलेल्या उत्तम योगदानाचा उल्लेख मोदींनी केला. ते म्हणाले की त्यांनी आणि मी एकाच वेळी दोन राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना मोदींना अश्रु अनावर झाले. त्यांचा गळा दाटून आला आणि त्यांना पुढे बोलताना बरेच कष्ट पडत होते. एका क्षणी तर त्यांनी पाण्याचा ग्लास मागवून नंतर उर्वरीत भाषण केले.

ते म्हणाले की मी गुलामनबी आझाद यांना अनेक वर्षांपासून जवळून ओळखतो. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना ते जम्मू काश्‍मीरचे मुख्यमंत्री होते. गुलामनबींना बागबगिचा तयार करण्याची मोठी हौस आहे हे अनेकांना ठाऊक नसेल. सन 2007 साली जम्मू काश्‍मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती प्रथम त्यांनी मला दिली होंती.

त्यावेळीही आझाद यांना अश्रु अनावर झाले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे काही गुजराती माणसे काश्‍मीरात अडकली होती. त्यांच्या सुटकेसाठी गुलामनबी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांनी केलेली मदत मी विसरू शकत नाही. या माणसांविषयी त्यांनी ज्या भाषेत आपुलकी दाखवली ती आपल्याच कुटुंबातील माणसांविषयी असलेल्या आपुलकीप्रमाणे होती असे ते म्हणाले. सत्ता येईल आणि जाईल पण ती कशी हाताळायची याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे असे ते म्हणाले.

आझाद आज निवृत्त होत असले तरी मी तुम्हाला कधीही निवृत्त होऊ देणार नाही. मी यापुढेही तुमचा सल्ला घेत राहणार आहे, माझी दारे तुमच्यासाठी कायमच उघडी असतील असेही मोदींनी यावेळी नमूद करीत आझाद यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की आझाद यांच्या जागी जो कोणी विरोधी पक्ष नेता येईल तो आझाद यांच्यासारखा नसेल कारण आझाद यांनी संपुर्ण देशासाठी आणि या सभागृहाच्या हितासाठी काम केले.

या निरोपाच्या भाषणाला उत्तर देताना आझाद यांनी कृतज्ञता व्यक्त करताना मोदींचेही आभार मानले. ते म्हणाले की मोदींनीही राजकारण आणि व्यक्तिगत संबंध कायमच वेगळे ठेवले. आम्ही सभागृहात एकमेकांच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली पण त्याचा आम्ही कधीही व्यक्तिगत संबंधावर विपरीत परिणाम होऊ दिला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.