पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहराचा गेल्या साडेचार वर्षांत नियोजनबद्ध विकास झाला असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा पाणीप्रश्नही भाजपच्याच माध्यमातून सोडविण्यात यश आल्याचा दावा महापालिकेतील भाजपाचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.
दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त ढाके आले होते. त्यावेळी डिजिटल प्रभातसाठी दिलेल्या मुलाखतीत बोलताना ढाके म्हणाले, सन 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरवासीयांनी भाजपाच्या हाती महापालिकेची सत्ता दिली. या सत्तेचा वापर शहर विकासासाठी करण्यात आम्हाला यश आले. गेल्या साडेचार वर्षांत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्म नियोजन करून शहराचा विकास करण्यावर आम्ही भर दिला. महत्त्वाची बाब म्हणजे एकही काम चढ्या दराने करण्यात आले नसून सर्व विकासकामे करताना उतरत्या दराचा अवलंब करून महापालिकेच्या पैशांचीही बचत करण्यात आल्याचे ढाके म्हणाले.
पाणी प्रश्नाबाबत बोलताना ढाके म्हणाले, शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाणी प्रश्न गहन बनत चालला होता. तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून शहरासाठी अतिरिक्त तीनशे एमएलडी पाणीसाठा उपलब्ध करून घेतला आहे. त्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यांत हे पाणी शहरात आणले जाणार आहे. अतिरिक्त पाणी उचलण्याच्या कामाला गती देण्यात आली असून लवकरच शहरात मुबलक पाणीपुरवठा होईल. चोवीस तास पाणीपुरवठ्याचही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार असून त्याचा पहिला टप्पा दोनच महिन्यात सुरू होईल, असा दावाही ढाके यांनी यावेळी केला.
विकासकामांबाबत बोलताना ते म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास पोहोचत नाही तोपर्यंत भाजपाच्या माध्यमातून काम सुरूच राहिल. प्रत्येक शासकीय योजना गरजू घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पालिकेच्या माध्यमातून अनेक योजना सध्या सुरू आहेत. सर्वसामान्य घटक हा केंद्रबिंदू मानून भाजपच्या माध्यमातून शहर विकासाचे काम सुरू आहे. संतपीठ, एसआरए, पीजी इन्स्टिट्यूटसारखे प्रकल्प भाजप नेत्यांच्या दुरदृष्टीमुळे उभारले गेल्याचा दावाही ढाके यांनी यावेळी केला.
सर्वांत कमी मृत्यूदर
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका आपल्या शहरालाही मोठ्या प्रमाणात बसला. शहराची लोकसंख्या अधिक असतानाही करोना रुग्णांचा सर्वांत कमी मृत्यूदर पिंपरी-चिंचवडचा असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाल्याचेही ढाके यावेळी म्हणाले.