- वर्षामागून वर्ष सरले; प्रतीक्षा काही संपेना
- सुमारे सहा वर्षांपासून काम अपूर्णच
पिंपरी – महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध कवी आणि गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या नावाने प्राधिकरणात साकारणाऱ्या नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार याची नाट्यकर्मींबरोबरच रसिकांना देखील प्रतीक्षा आहे. जवळपास पावणेसहा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप हे काम अपूर्ण आहे. “वर्षामागून वर्ष सरले, प्रतीक्षा काही संपेना’ अशीच स्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे.
महापालिकेने चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे रंगमंदिर साकारले. भोसरीवासियांच्या सुविधेसाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह उभारले. तर, पिंपळे गुरव येथे निळू फुले नाट्यगृह उभारले. त्यानंतर सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीजवळ गदिमा नाट्यगृहाचे काम सुरू आहे. या नाट्यगृहात मूळ नाट्यगृहाबरोबरच कलादालन असल्याने चित्रकारांना चित्र प्रदर्शन, छायाचित्रकारांना छायाचित्र प्रदर्शन भरविता येईल.
कॉन्फरन्स हॉल, छोट्या नाट्यगृहाची सोय असल्याने छोटे कार्यक्रम, बैठका, छोट्या स्वरुपातील नाट्य प्रयोग होऊ शकतील. दोन एकर क्षेत्रात हे नाट्यगृह साकारत आहे. 850 आसन क्षमतेचे मूळ नाट्यगृह आहे. त्याशिवाय, 200 आसन क्षमतेचे छोटे नाट्यगृह, 110 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, कलाकारांना राहण्यासाठी 12 खोल्या, आर्ट गॅलरी, कॅफे टेरिया, 5 हजार चौरस फूट जागेत रेस्टॉरंट आदींची सोय असणार आहे. नाट्यगृहाच्या कामासाठी डिसेंबर 2014 मध्ये कार्यादेश दिले. मात्र, प्रत्यक्ष कामाला जानेवारी 2015 मध्ये सुरवात झाली. तीन वर्षांच्या मुदतीत काम पूर्ण होऊ न शकल्याने मुदतवाढ देण्यात आली.
दोन टप्प्यांमध्ये काम
नाट्यगृहाचे काम दोन टप्प्यांमध्ये केले जात आहे. पहिल्या टप्प्यात 3 इमारती उभारल्या. त्यामध्ये नाट्यगृह, छोटे नाट्यगृह, कॉन्फरन्स हॉल, कलाकारांसाठी खोल्या, आर्ट गॅलरी, कॅफे टेरिया आदींचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याशिवाय, प्रत्येकी 500 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सोय केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 37 कोटी रुपयांचा खर्च मंजूर आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम नोव्हेंबर-2019 पासून सुरू झाले. इंटेरिअर, फ्लोअरिंग, इमारत सुरक्षाविषयक आणि विद्युतविषयक कामे, वातानुकूलित यंत्रणा, ट्रॉन्सफॉर्मर आदी कामांसाठी स्वतंत्र निविदा काढली आहे. 16 मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.
नाटकांसाठी हवे पोषक वातावरण
महापालिकेकडून प्राधिकरणात नाट्यगृह साकारत आहे, ही चांगली बाब आहे. नवीन नाट्यगृह साकारताना पिंपरी-चिंचवडमध्ये नाटकांसाठी पोषक वातारण कसे निर्माण होईल, याचीही दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यायला हवी. दिग्गज कलाकारांचे नाट्यप्रयोग वगळता स्थानिक संस्थांकडून होणाऱ्या नाट्यप्रयोगांना अपुरा प्रतिसाद मिळतो. महापालिकेकडून नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक तारखा मिळत नाही. नाट्यगृहांकडून अनामत शुल्काची रक्कम अवाजवी घेतली जात आहे. शहरातील नाट्यसंस्था क्रियाशील राहाव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत नाट्य दिग्दर्शक व लेखक प्रभाकर पवार यांनी व्यक्त केले.
प्राधिकरणातील नाट्यगृहाचे काम मार्च-2021 अखेर पूर्ण होईल. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. लॉकडाऊनमुळे साडेतीन ते चार महिने काम बंद होते. पर्यायाने काम पुढे ढकलले गेले. सध्या नव्याने विद्युतविषयक कामे सुरू केली आहेत.
– ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता, महापालिका.