देहूगाव, (वार्ताहर) –
मी का पडेन निराळा ।
ऐसा सांडोनि सोहळा ॥
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा संपन्न होत असताना आलेल्या भाविक भक्तांनी संत तुकाराम महाराज चरणी नतमस्तक होऊन सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचे समाधान व्यक्त केले.
आम्ही जातो आपुल्या गांवा।
आमचा राम राम घ्यावा | |
तुमची आमची हेची भेटी |
येथोनिया जन्मतुटी | |
आता असो द्यावी दया |
तुमच्या लागतसे पाया | |
येतां निजधामीं कोणी |
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी| |
रामकृष्ण मुखी बोला |
तुका जातो वैकुंठाला | |
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा फाल्गुन वद्य द्वितीया वैकुंठगमन दिन अर्थात बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविक, भक्त बुधवारी (दि. २७) श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी सव्वा बारा वाजता उपस्थित भाविकांनी मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या वृक्षावर बुक्का, तुळशी -पानफुले उधळण करीत हा सोहळा पहायला मिळाल्याने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त करत माघारी फिरले.
जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची जन्म, कर्म, योग भूमी असलेल्या देहूनगरीत दाखल झालेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा- टाळ – मृदंगाच्या गजरात भजन कीर्तन व हरिनामाच्या जयघोष सुरू होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच पांडूरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात आणि गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
वैंकुठगमन मंदिराच्या परिसरात जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल अशा ठिकाणी बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री व पहाटे हवेत हलके गारवा असला तरीही सकाळी दहा वाजल्यानंतर मात्र, उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवू लागला होता. अशा उन्हातही भाविकांच्या मुखी हरिनाम व अंत:करणात भगवंताला अभिवादन करण्याची ओढ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात व बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली. “श्रीं “ची आरती, श्री विठ्ठल रुखमाई, शिळा मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा, वैकुंठगमण मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे,
संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, वंशज यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर बीज सोहळा झाला. या वेळी राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या भाविकांनी नतमस्तक होत आणि आपल्याला या सोहळ्यात सहभागी होता आल्याने धन्य मानत माघारी फिरले.