- विषय समितीच्या अध्यक्षपदासाठी फिल्डींग
- भोसरी आणि चिंचवड गटामध्ये रस्सीखेच
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समित्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड मंगळवारी (दि. 6) सर्वसाधारण सभेत करण्यात आली. शहरामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकामध्ये नेहमीच पद मिळविण्यासाठी चुरस सुरू असते. आताही विषय समितीच्या अध्यक्षपदासाठी सदस्यांमध्ये चुरस सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी दीड वर्ष बाकी राहिले आहे. त्यामुळे ज्यांना चार वर्षात पद मिळाले नाही, त्यांनी आपआपल्या नेत्याकडे फिल्डींग लावायला सुरूवात केली आहे.
विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज (सोमवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. विषय समित्यांचे अध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महिला व बालकल्याण आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद यांची निवड केली आहे. या विषय समितीच्या अध्यक्षपदासाठीचे अर्ज महापालिका नगरसचिव कार्यालयात दाखल करायचे आहेत.
महापालिका विषय समित्यांमध्ये विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीवर 9 नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यात संख्या बळानुसार प्रत्येक समितीवर भाजपचे पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले तरी त्यांची संख्या प्रत्येक समितीत चारच होते. त्यामुळे भाजपचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.
मात्र, चार वर्षामध्ये एकही पद न मिळालेल्या सदस्यांची संख्या जास्त आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये उघडपणे भोसरी आणि चिंचवड असे दोन गट आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे आहेत. त्यांच्या गटाकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद आहे. तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाकडे महापौर आणि पक्षनेत्याचे पद आहे. शिक्षण समितीचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी भोसरीच्या सोनाली गव्हाणे यांना संधी मिळाली होती. तर दुसऱ्या वर्षी थेरगावच्या मनिषा पवार यांना संधी मिळाली. त्यामुळे यंदा पुन्हा भोसरीच्या गटाला प्राधान्य मिळण्याची शक्यता जास्त आहे. विधी समितीसाठी गेल्यावर्षी पिंपरीच्या अश्विनी बोबडे सभापती होत्या.
क्रीडा समितीसाठी चिंचवड गटाचे तुषार हिंगे हे सभापती होते. महिला व बालकल्याण समितीच्या मावळत्या सभापती निर्मला कुटे या चिंचवड गटाच्या आहेत. शहर सुधारणा समितीसाठी गेल्यावर्षी भोसरी गटाचे राजेंद्र लांडगे अध्यक्ष होते. यंदा कोणत्या समितीवर कोणत्या गटाच्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून निवड होणार याबाबत शहरात चर्चा रंगली आहे.
——-
विषय समित्यांमधील भाजप सदस्य
विधी समितीच्या स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले. महिला व बालकल्याण समितीच्या योगिता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, निर्मला गायकवाड. शहर सुधारणा समितीच्या साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोफणे, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे. कला-क्रीडा-सांस्कृतिक समितीच्या अश्विनी जाधव, केशव घोळवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ. शिक्षण समितीच्या सारिका सस्ते, प्रियांका बारसे, मनीषा पवार, माया बारणे, तुषार कामठे यांचा समावेश आहे.
—
चार गटाच्या भाजपमध्ये उपमहापौर कोण?
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शहरामध्ये चांगलीच चर्चा रंगली. पक्षाच्या आदेशाने आपण अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकऱण हिंगे यांनी दिले. महापालिका निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. ज्यांना या सत्तेच्या कालावधीत पदे मिळाली नाही. ते बंड करण्याची शक्यता जास्त आहे. दोन्हीही आमदारांना आपल्याच समर्थकांना देण्यासाठी चुरस रंगली आहे. त्यामध्येच शहरामध्ये पूर्वी असलेल्या दोन गटांमध्ये आणखी दोन गटांची भर पडली आहे. शहरामध्ये गडकरी आणि मुंढे हे दोन गट आहेत, त्यासोबतच भोसरी आणि चिंचवड अशा चार गटात विभागलेल्या भाजपमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.