पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना आज (सोमवारी) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तर महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एका ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 18) अटक केली होती.
जाहिरातींचा व्यवसाय करणाऱ्या एका ठेकेदाराने स्थायी समितीमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीबाबत पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर बुधवारी (दि. 18) या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करत स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे, संगणक चालक राजेंद्र शिंदे, लिपीक विजय चावरिया व शिपाई अरविंद कांबळे या पाच जणांना अटक केली होती. सुरुवातील गुरुवारी (दि. 19) दोन दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा शनिवारी या पाच जणांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. 23) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र ऍड. नितीन लांडगे यांच्यामार्फत घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली. यावर न्यायालयाने गुरुवार, दि. 26 ऑगस्टपर्यंत लांडगे यांना अंतरिम जामीन दिला आहे. उर्वरित चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.