पिंपरी – आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टूर बुकिंग करतो, म्हणून पिंपरी-चिंचवड येथील टूर एजंटकडून लाखो रुपये उकळून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आले. याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील एजंटच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुंधती किशोर रहाणे (वय-32 रा. आळंदी-देहूरोड, मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मोहित संजय पांडोह रा. पिंपवाली गल्ली, लिंकरोड जम्मू काश्मीर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील टुरिंग एजंट यांच्याकडून आरोपीने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टूर बुकिंगकरिता वेळोवेळी बॅंक खात्यामध्ये 33 लाख 78 हजार 400 रुपये ऑनलाईन भरणा करण्यास सांगितले. पैसे घेतल्यानंतर मात्र आरोपीने टूर्स आयोजित न करता ही रक्कम हडप करुन फसवणूक केली. या प्रकरणी निगडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.