पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. 21) आणखी दोन करोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुळशी आणि पुरंदर तालुक्यातील हे रुग्ण आहेत.
मारुंजी (ता. मुळशी) येथील 38 वर्षीय आणि माळवाडी वीर (ता. पुरंदर) येथील 39 वर्षीय पुरुष रुग्णांचा बाधितामध्ये समावेश आहे.
आज नव्याने 12 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत 584 जणांना उपचारासाठी दाखल केले. त्यातील 73 जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, 507 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 4 रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. रुग्णालयात सध्या 26 जणांवर उपचार सुरू आहेत.
त्यातील 9 जण अत्यवस्थ आहेत. 25 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 15 जणांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. तर, आत्तापर्यंत 8 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.