पिंपरी – गेली कित्येक वर्षे शहरातील रेड झोनचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार व संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करुन देखील हा प्रश्न आजतागायत जैसे थे.. स्थितीत आहे. या मुद्यावरुन स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय पोळ्या भाजून घेतात. रेड झोनमध्ये टोलेजंग इमारती बांधून घरांची राजरोसपणे विक्री केली जात आहे. याला चाप कधी बसणार? आणि सामान्य नागरिकांची रेड झोनमधून सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहे.
देहूरोड ऑर्डनन्स फॅक्ट्रीमुळे निगडी सेक्टर 22, रुपीनगर, तळवडे, चिखली, यमुनानगर, रावेत त्याचबरोबर दिघी मॅगझिनमुळे भोसरी, मोशी, वडमुखवाडी, पांजरपोळ हा भाग रेड झोन क्षेत्रात येतो. लष्कराच्या गोपनीयतेचा भाग म्हणून केंद्र सरकारने लष्कर हद्दीपासून 2000 यार्डपर्यंत लोकवस्तीला प्रतिबंध घातले आहेत. परंतु, तत्पूर्वीच या भागात लोकवस्ती वाढत गेली. आजरोजी रेड झोन क्षेत्रात अनधिकृत घरे बांधण्यावर भर दिला जात आहे. आता कोणतीही बॅंक या भागातील घरांसाठी कर्ज द्यायला तयार नाही.
सामान्य नागरिकांची रेड झोनमधून सुटका करण्यासाठी केंद्र शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. दिवंगत खासदार गजानन बाबर, शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेकदा प्रयत्न केले. रेड झोनची हद्द 2000 यार्डवरुन 500 यार्ड करण्याची काहीजणांची मागणी आहे.
रेड झोन नेमका कुठून सुरू होतो, त्याच्या सीमा कोणत्या, रेडझोनबाधित क्षेत्र नेमके कोठे व कोणते, याबाबत कोणतेही रेखांकन केलेले नाही. त्यामुळे अनेक जण रेड झोनमध्ये प्लॉटिंग करून विक्री करत आहेत. काहींनी गृहप्रकल्प उभारून सदनिका विक्रीचा धंदा सुरु केला आहे. त्यामुळे रेड झोनबाबत सर्व्हे क्रमांक आणि प्लॉट क्रमांकानुसार नकाशे हद्द नव्याने जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांच्याकडून विलंब केला जात आहे. त्यामुळे किती दिवस नागरिकांची फसवणूक करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिका उदासीन
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरव राव यांना दिले होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी महापालिका आयुक्तांना नव्याने नकाशे जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याने महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे.