Lok Sabha Election 2024। बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. या जागेवरून रोहिणी आचार्य या राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार आहे. सोमवारी सायंकाळी मतदान संपल्यानंतर रोहिणी आचार्य पोहोचलेल्या छपरा शहरातील बूथवर मोठा गोंधळ झाला. यावरून वाद वाढत असताना आज मंगळवारी सारण येथे दोन्ही पक्षांमध्ये गोळीबार झाला, त्यात तीन जणांना गोळ्या लागल्या आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर सारणमध्ये दोन दिवसांपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. या घटनेनंतर छपराच्या भिखारी ठाकूर चौकाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी एसपी आणि डीएमही उपस्थित आहेत. सोमवारी संध्याकाळी RJD उमेदवार रोहिणी आचार्य या भागातील बूथ क्रमांक 118 वर पोहोचल्या होत्या. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, ‘दोन्ही बाजूचे अनेक लोक होते. खूप गर्दी होती. दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्या घेऊन लोक आले. गोळ्याही झाडल्या. तीन जणांना गोळ्या लागल्या आहे.’ रोहिणी आचार्य यांनी बूथवर पोहोचल्यानंतर मतदारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत होते. संतप्त जमाव पाहून रोहिणी आचार्य यांना तेथून जावे लागले, मात्र मंगळवारी सकाळी हा वाद पुन्हा चिघळल्याने गोळीबार झाला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांतर्गत सोमवारी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांवर मतदान झाले. या टप्प्यांतर्गत बिहारमधील सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर या पाच जागांवर मतदान झाले. बिहारमध्ये पाचव्या टप्प्यात ५२.९३ टक्के मतदान झाले.