पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचा राष्ट्रवादीला इशारा
पिंपरी – ज्यांची पूर्वाश्रमीची वाटचाल आणि भावी वाटचाल जातीयवादी पक्षांच्या जवळ जाणारी आहे. त्यांना कॉंग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड व भोसरीमध्ये कॉंग्रेसच्या परस्पर विधानसभेसाठी “पुरस्कृत’ उमेदवार जाहीर करू नये व त्यासाठी कॉंग्रेसला गृहित धरु नये, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेस माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, सुदाम ढोरे, गौतम आरकडे, राजेंद्रसिंह वालिया, मयूर जैसवाल, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगुटमल, मकरध्वज यादव, सुंदर कांबळे, शितल कोतवाल आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेपूर्वी कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची प्राधिकरणात बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबात सुरु असणाऱ्या शहरातील घडामोडींविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. साठे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाची भूमिका नेहमी जातीयवादी पक्षांविरूद्ध लढण्याची आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉंग्रेसची विचारधारा मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पार्थ पवारांचा व खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचार केला होता. आघाडीचा धर्म पाळावा असा कॉंग्रेसच्या वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे. परंतू, “पुरस्कृत’ उमेदवाराला मदत करा, असा आदेश नाही.
शहरात कोणताही उमेदवार पुरस्कृत करण्या अगोदर राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी संवाद साधायला हवा. स्थानिक पातळीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी व वरिष्ठ पातळीवर वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने कोणताही उमेदवार पुरस्कृत करू नये. व त्यासाठी कॉंग्रेसला गृहित धरु नये, असाही सूचक इशारा सचिन साठे यांनी यावेळी राष्ट्रवादीला दिला.