पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सहा दिवसापूर्वी शहरात दिवसाला साधारण 30 रूग्ण आढळून येत होते. आता दिवसाला सरासरी 300 रूग्ण आढळून येत असून रूग्ण संख्येत दहा पटीने वाढ झाली आहे. शहरात आत्तापर्यंत 3 हजार 47 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये शालेय मुलांचे प्रमाण अधिक असून डोळ्यांचा संसर्ग हा ऍडिनो व्हायरसमुळे होत आहे.
वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. सध्या राज्यभरात डोळ्यांची साथ पसरली आहे. लहान मुलांना डोळे येण्याच प्रमाण अधिक आहे. डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला तरी संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. शहरात 3 हजार 47 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. दिवसाला 300 जणांना प्रादुर्भाव होत आहे. मात्र, अद्याप एकाही बाधिताला रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. डोळ्यात सोडण्याचे औषध देऊन रुग्णाला घरी सोडले जाते. या औषधावरच रुग्ण तीन ते चार दिवसात बरे होत आहेत. ज्या शाळेत पाचपेक्षा जास्त मुलांना प्रादुर्भाव झाल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला देण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे. शाळेने तपासणीस बोलविल्यास वैद्यकीय टीम शाळेत जाऊन मुलांची तपासणी करत असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.
आजाराची लक्षणे
डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे दुखणे, पाणी येणे, ताप आल्यासारखे होणे, प्रकाश सहन न होणे ही लक्षणे आहेत. या साथीचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा वापरु नये असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.
पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा. ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्याला वारंवार हात लावू नये, नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या पालिकेच्या रुग्णालयात, दवाखान्यात, आरोग्य केंद्रात वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे.
-डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी