पिंपरी -शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एका वर्षात सुमारे 10 हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने विविध उपाय योजना करण्यास सुरूवात केली असून भटक्या श्वानांचे रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सोमवार (दि.28) अखेर शहरातील 500 श्वानांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 70 हजार भटके श्वान आहेत. शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील 70 हजार भटक्या कुत्र्यांपैकी 25 टक्के म्हणजे सुमारे 17 हजार 500 कुत्र्यांचे नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. निर्जन भागातून विशेषतः रात्रीच्या वेळी जात असताना भटके श्वान नागरिकांवर धावून जातात. चावा घेतल्याने नागरिक विशेषतः लहान मुले जखमी होत आहेत. त्यामुळे भटक्या श्वानांचे रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार पालिकेने भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यास 4 नोव्हेंबरपासून सुरूवात केली आहे. श्वानांना एकदा लसीकरण केले तर तीन वर्ष त्याची क्षमता राहते. आतापर्यंत 500 श्वानांचे लसीकरण झाले आहे. रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याने नागरिकांना श्वान जरी चावले तरी नागरिकांना जास्त धोका संभवत नाही.
स्वयंसेवी संस्था, प्राणी मित्रांचे सहकार्य
शहरातील जास्तीत-जास्त श्वानांचे रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यास पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाचा प्रयत्न आहे. यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था आणि 180 प्राणी मित्रांची मदत घेतली जात आहे. लसीकरणासाठी वेळापत्रक आखण्यात आले आहे. यासाठी 5 जणांचे एक पथक नेमण्यात आले असून एका दिवसात 25 ते 30 श्वानांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.
मांजर पाळण्यासाठी ऑनलाइन परवाना सुरू
श्वानांच्या परवान्यानंतर आता पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने मांजर पाळण्यासाठी परवाना बंधनकारक केला आहे. याची 25 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. यासाठी एक नमुना अर्जही तयार करण्यात आला आहे. तीन दिवसात 6 जणांनी मांजर पाळण्यासाठी अर्ज केले आहेत.