पिंपरी – मोठ्या थाटात निर्माण केलेल्या रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील झाडांची नासधूस केली जात आहे. उद्यानातील झाडांची बांधकाम व्यावसायिकाकडून कत्तल केली जात आहे. याच्या निषेधार्त वृक्षप्रेमी नागरिकांकडून मेट्रो इको पार्कच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जोपर्यंत हे उद्यान नागरिकांसाठी खुले होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्या नागरिकांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने महामेट्रोला सन २०१७ मध्ये ५ एकर जागा दिली. मेट्रोने त्या ठिकाणी सुमारे १ हजार झाडे लावली आहेत. ती चांगली वाढली आहेत. नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण करून ती जागा मेट्रोने पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली. त्यानंतर पीएमआरडीएने त्या पार्कचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयास दिला. ती जागा आता निवडणूक आयोगास देण्यात आली आहे. तेथे निवडणूक आयोगासाठी गोदामाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी इको पार्कला टाळे ठोकले आहे. झाडांची निगा न राखल्याने व पाण्याअभावी येथील १४० झाडे करपल्याचा अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान विभागाने दिला आहे. हे इको पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झाडे तोडल्यास वृक्ष कायदा, जैवविविधता कायदा व वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच, वृक्षतोड करणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकांवरही कारवाई करावी, या मागणीसाठी रावेत मेट्रो इको पार्क बचाव समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयास निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनात समितीचे प्रशांत राऊल, विकास बडोलिया, ॲड. ज्ञानेश्वर चव्हाण, संगीत सुखटणकर, अमोल शिंदे, संपतराव शिंदे, ब्रम्हानंद घुगरे व रहिवाशांनी सहभाग घेतला.