पिंपरी – महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने १० महिन्यात तब्बल ७०० काेटी थकीत कर वसूल केला आहे. मार्चअखेरपर्यंत थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करणे शक्य नाही, त्याठिकाणी त्या जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी थकबाकीदारांनी त्वरित कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी तब्बल ४ लाख २१ हजार मालमत्ता धारकांनी ७१६ कोटी ४० लाख रूपये थकीत कराचा भरणा केला आहे. जनजागृती, वारंवार आवाहन, जप्ती पूर्व नाेटीस, माेबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. त्याचबरोबर कर न भरणा-या मालमत्ता धारकांविरोधात कठाेर पाऊले उचलली जात आहेत.
शहरात थकबाकीदारांमध्ये रहिवाशी मालमत्तांची संख्या माेठी असून, त्यांना पाच वेळा भेटी देऊन कर भरण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रतिसाद न दिल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही दिला आहे. मानवतेच्या दृष्टीकाेनातून रहिवाशी सदनिका महापालिका सील करत नाहीत. परंतु, यापुढे अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. मात्र, ही जप्ती मालमत्ता सील न करता किंवा कुठलीही जंगम मालमत्ता जप्त न करता केली जाणार आहे. त्यासाठी त्या मालमत्तेवर जप्ती अधिपत्र लावले जात आहे.
रहिवाशी आर्थिक सक्षम असूनही प्रतिसाद देत नसलेल्या एकूण मालमत्ताधारकांकडे ३०० कोटीच्यांवर थकबाकी आहे. यापूर्वी बंद असलेल्या रहिवाशी सदनिका सील केल्या होत्या. गत वर्षी त्यांची संख्या ७० च्यावर होती. यावर्षी अशा जप्त केलेल्या मालमत्तांची संख्या १०० च्यावर गेली आहे, आणि ही कारवाई ३१ मार्चपर्यंत चालू राहणार आहे.
२८३ मालमत्ता जप्त, ९८ मालमत्तांना अधिपत्र लावले
कर न भरणाऱ्या १७ झोनमधील तब्बल २८३ मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापैकी ९८ निवासी मालमत्तांना अधिपत्र लावले आहे. त्यापैकी २५ मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण असून, पहिल्या टप्प्यात या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित मालमत्तांचे वेगाने मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर संबंधित मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. थकीत कर न भरणाऱ्या २५ मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित कले आहेत.
असा आला रूपया
ऑनलाईन – ४३० कोटी ४८ लाख
विविध ॲप – ८ कोटी ९३ लाख
रोख – ९६ कोटी ५७ लाख
धनादेशाद्वारे – ८८ कोटी १८ लाख
इडीसी- ८ कोटी ३७ लाख
आरटीजीएस – ३७ कोटी ४७ लाख
मालमत्ता कर नोंदणी अभियान सध्या वेगाने चालू आहे. वर्षभरात सर्व मालमत्ता धारकांना सर्व सवलती, सुविधा घर बसल्या मिळतील. नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक वसुली करून नवा विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न आहे.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग