पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) -अखंडित वीज पुरवठ्यासाठी पुढील 25 वर्षांचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. वीज वितरण समितीच्या बैठकीत आमदार बनसोडे बोलत होते. पिंपरी विधानसभा मतदार संघातील वीज समस्या सोडविण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या वीज वितरण समितीची बैठक घेऊन आमदार बनसोडे यांनी अडचणींचा व विकासकामाचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता भोसले, उपअभियंता गणेश चाकूरकर, सदस्य अजय चव्हाण, नितीन वाघमारे, दिपक साळवे यांच्यासह महावितरण पिंपरी व भोसरी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेमार्फत होणारी सततच्या रस्ते खोदाइमुळे विद्युत केबल डॅमेज होत आहे. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होते. महावितरणला डॅमेज केबलचे ठिकाण शोधण्यात बराच वेळ जातो. परिणामी महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खंत अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. आमदार बनसोडे पुढे म्हणाले, रस्ते खोदाईमुळे विद्युत वाहिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन व्हावे यासाठी महावितरण अधिकाऱ्यांसमवेत मनपा आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढू. पिंपरी भागात अनेक ठिकाणी डीपी बॉक्स उघडे तसेच जमिनीत गाडले गेले आहेत. याची दुरुस्ती तातडीने करावी. पिंपरी विधानसभा मतदार संघात 2019-20 साली 37 लाख, 2020-21 मध्ये 3 कोटी रुपयांची कामे करण्यात आली. पिंपरी कॅम्प परिसरामध्ये सब स्टेशन व स्मार्ट मीटर बसविण्यासाठी 127 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बनसोडे
यांनी दिली.
सदस्य पदाचा गैरवापर करू नका
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विज प्रश्न सोडविण्यासाठी समिती सदस्यांनी काम करावे व नागरिकांच्या समस्या अधिकारी वर्गापर्यंत पोहचवून त्या समस्या सोडविण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत. पदाचा वापर करून गैरकृत्य करू नये अशी तंबी आमदार बनसोडे यांनी समितीच्या सदस्यांना दिली. धिकारी वर्गाने समिती सदस्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांचा सहकार्याने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी सूचना केली.