अकलूज – राजकारण, समाजकारण करताना राजमाता कै. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचा आध्यात्माचा वारसा मोहिते-पाटील परिवाराने मनोभावे जोपासला आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
उद्योगमहर्षि स्व. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या 62 व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने स्मृतिभवन येथे दि. 2 ऑक्टोबर ते दि. 6 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा प्रवाह भक्तीरसाचा या किर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील बोलत होते.
याप्रसंगी शिवशंकर बझारच्या अध्यक्षा स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, शिवरत्न उद्योग समुहाचे अध्यक्ष किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, सुनील खेडकर, प्रतिक जोशी, प्रमोद टकले, कीर्तनकार समन्वयक प्रमोद ननवरे आदी उपस्थित होते.
यावेळी धैर्यशील मोहिते – पाटील म्हणाले की, कै.रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील यांचा आध्यात्माचा वारसा जपत असताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना निधी उपलब्ध करून दिला. स्व. उदयबापूंनी ठाकुरबुवा येथे सभामंडपाची उभारणी केली. बार्शी येथे किर्तन व भजनाच्या दृष्टीकोनातून शाळा उभ्या करून तेथे निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.