पिंपरी – भारतीय स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर आणि वीरांगणांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाभिमान, कर्तव्यदक्षता आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवण्याची पंचप्रण शपथ बुधवारी (दि.9) महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून मेरी माटी मेरा देश, अभियानाचा प्रारंभ अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचप्रण शपथ घेऊन झाला. महापालिकेत झालेल्या या कार्यक्रमास शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता रामदास तांबे, संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मिनीनाथ दंडवते, अजय चारठणकर, संदीप खोत, मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी, जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच क्रांती दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कर्मचारी महासंघाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत शंकरअण्णा गावडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त खोराटे, जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मेरी माटी, मेरा देश अभियाना अंतर्गत विविध उपक्रम पालिकेतर्फे शिलाफलक, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन, सामुहिक ध्वजारोजन कार्यक्रम, हर घर तिरंगा अभियान, नागरी सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.