पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मैदाने औद्योगिक स्पर्धांसाठी महाग झाली आहेत. स्पर्धा घ्यायच्या असेल तर दिवसाकाठी 20 हजारांचा खर्च आकारला जात आहे. हा खर्च अधिक होत असल्याने औद्योगिक क्रीडा संघटनांना कंपन्यांना विनवण्या करून त्यांची मैदाने स्पर्धेसाठी घ्यावयास धडपड करावी लागत आहे.
विविध कंपन्यांमधून निवृत्त झाल्यानंतर कंपनीतील कामगारांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला. त्यामधून पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्रीडा संघटनेची निर्मिती करण्यात आली. या संघटनेमार्फत शहरात कंपन्यातील अधिकारी, कामगारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, बुद्धीबळ, टेबल-टेनिस, कॅरम, ऍथलेटिक्स, पोहणे आदीसह 30 पेक्षा अधिक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मात्र या स्पर्धा आयोजित करण्यासाठी स्वस्तात मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार आयोजक करत आहेत.
स्पर्धांचे आयोजन करताना नाममात्र फी आकारली जात आहे. त्याच्या तुलनेत येणारा खर्च अधिक असल्याचे क्रीडा संघटनांकडून सांगितले जात आहे. खासगी अथवा महापालिकेच्या मैदानावर स्पर्धा भरावयच्या असल्यास दिवसाकाठी 20 ते 40 हजार रुपये दर आकारले जात आहेत. काही स्पर्धा पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस चालतात. त्याचा खर्च लाखांवर जाण्याची शक्यता असते. एवढा पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आयोजकांपुढे पडत आहे.
कंपन्यांच्या मैदानासाठी विनंतीची वेळ
खासगी अथवा महापालिकेची मैदाने स्वस्तात न मिळाल्याने स्पर्धा कुठे भरवायच्या असा प्रश्न औद्योगिक क्रीडा संघटनेपुढे निर्माण होत आहे. अशा वेळी शहरातील मोठ्या कंपन्यांना विनंती करण्याची वेळ येत आहे. संबंधित कंपन्यांना स्पॉन्सर होण्याबाबत विनंती करून त्यांची स्पर्धेदरम्यान जाहिरात केली जात आहे. त्यानंतर या कंपन्या विना मोबदला मैदाने उपलब्ध करून देत आहेत. मात्र त्यासाठी सातत्याने प्रयन्त करावे लागत आहेत.
स्पर्धांचे आयोजन करायचे असल्यास स्वस्तात मैदाने उपलब्ध होत नाहीत. दिवसाकाठी सुमारे 20 हजार रुपयांचे भाडे आकारले जात आहे. एवढा खर्च कोठून आणायचा असा प्रश्न आहे. त्यामुळे कंपन्यांना मैदाने देण्याबाबत विनंती करावी लागत आहे.
– प्रदीप वाघ, समन्वयक, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्रीडा संघटना.