पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील लम्पी संकट ओसरले असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील 90 जनावरांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी 14 जनावरांना अजूनही उपचार सुरू आहेत, तर तीन जनावरे दगावली आहेत. लम्पीग्रस्त जनावरांवर उपचार सुरू असून ती बरी होत आहेत. 14 पैकी चार जनावरे भटकी आहेत, परंतु त्यांच्यामुळे इतर जनावरांना लागण होऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. लम्पीची बाधा झालेल्या जनावरांवर तातडीने उपचार करण्यात आले. तर, शहरातील सरसकट 2 हजार 137 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शहरातील पाळीव अथवा मोकाट अशा सर्वच जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पाळीव तसेच मोकाट जनावरांना धोका निर्माण झाला होता. शहरात आजअखेर 90 जनावरांना लम्पीची बाधा झाल्याचे आढळून आले होते. त्यातील 14 केसेस सध्या सक्रिय असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. त्यातील चार जनावरे भटकी आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार करुन त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर लम्पीने तीन जनावरे दगावली आहेत.
यंदा प्रादुर्भाव कमी
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लम्पी आजाराच्या लक्षणांत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील लम्पी आजाराच्या लाटेत जनावरांना पुरळ येणे, डोळ्यातून पाणी येणे, ताप येणे, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसत होती. मात्र, यंदा फक्त जनावरांच्या अंगावर पुरळ दिसून येत आहे. शिवाय जनावरांचे तापमानही कमी आहे, अशी माहिती पशू वैद्यकांनी जाहीर केली आहे.
सुरुवातीच्या काळात लम्पीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे दिसून आला. परंतु, आपण तातडीने लसीकरण हाती घेतल्यामुळे वाढणारी संख्या अटोक्यात आली. लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांवर योग्य उपचार करण्यात आले. शिवाय लसीकरणही वेगाने पूर्ण केले. सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाही.
-संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग