पिंपरी – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या “अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या संत तुकाराम व्यापार संकुल परिसरात व्यवसायास निर्बंध व विक्रेत्यांना अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात येत आहेत. याविरोधात “आम्हाला स्मार्ट सिटी नको, रोजी-रोटी द्या” अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. स्मार्ट सिटीमध्ये गरिबांनी जगायचे का नाही? असा सवाल यावेळी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी उपस्थित केला. नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयावर सामाजिक अंतर ठेवत निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, महापालिका समिती सदस्य राजेंद्र वाकचौरे, संघटक प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मधुकर वाघ, अंबालाल सुखवाल, वसंत जाधव, प्रकाश साळवे, ओम प्रकाश, प्रकाश मेहेर, फरीद शेख, रामा बिराजदार, देवीलाल आहेर, काशीम तांबोळी यांच्यासह विक्रेते उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की, स्मार्ट सिटीचे कार्य हे केवळ सीसीटीव्ही कॅमेरे, चकचकीत रस्ते नव्हे. मुळात सुनियोजित असलेल्या ठिकाणाला निवडून त्याच ठिकाणाला स्मार्ट करण्याचे प्रकार होत असल्याने स्मार्ट सिटीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
गगनचुंबी इमारती म्हणजे स्मार्ट सिटी नसते तर शहरातील नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी काय उपाययोजना केल्या यावर ते ठरते. महापालिकेने याबाबत कायदेशीर नोटीस दिली असून यापुढे लढाई तीव्र करु. महापालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करुन विक्रेत्यांवरील कारवाई थांबवावी, अशा मागण्यांचे निवेदन अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांना दिले.