इंद्रायणीनगर – प्रशस्त सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, पदपथ, सायकल ट्रॅक, आंतरराष्ट्रीय धरतीवरील उद्याने व गगनचुंबी इमारतींनी आपले पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. शहराचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी वीज वितरणाच्या केबल, सीसीटीव्ही कॅमेरा केबल भूमिगत पद्धतीने घेतल्या आहेत. मात्र शहरातील खासगी केबल व्यावसायिकांनी टीव्ही केबल, इंटरनेट केबल पदपथाच्या पोलवरून, उड्डाणपुलावरून टाकून शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण केली आहे. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या केबल व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भोसरी उड्डाणपुलाला ठिकठिकाणी बांधलेले केबलचे पुंजके, अनेक ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी मोकळ्या आकाशात विनलेले केबलचे जाळे, तर काही ठिकाणी गगनचुंबी एका इमारतीवरून थेट दुसऱ्या इमारतीवर टाकलेल्या केबल, धावत्या रस्त्यावर मध्येच तुटून पडलेल्या, लोंबकळत असलेल्या केबल शहरातील बहुतांश भागांत सर्रास पहावयास मिळतात.
शहराची झालेली दुरवस्था पाहून या व्यावसायिक केबलधारकांना प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. मनात येईल त्याप्रमाणे केबल चेंडू बांधून शहरातील उंच इमारती, पथदिव्यांचे खांब, उड्डाणपूल, उंच असणारी झाडे या केबलच्या जाळ्यांमुळे बाधित झाली आहेत. अशाप्रकारांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसत आहे. या प्रकारांना आळा घालणार कोण? सेवा पुरविण्याच्या गोंडस नावाखाली स्मार्ट सिटीला गालबोट लावणाऱ्यांनी शहराची वाट लावली असल्याचे चित्र आहे.
चौकांच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी खर्च
पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु याच चौकात केबलचे अनधिकृत जाळे निर्माण होऊन चौकाचे विद्रुपीकरण होत आहे याकडे मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या अनधिकृत केबल नेटवर्कला महापालिकेची तर मूकसंमती नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.