पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. त्यासाठी सुनियोजित रस्ते, सायकल मार्ग, पदपथ आणि सुशोभिकरण करण्यात येत आहे. मात्र, तयार करण्यात आलेल्या पदपथांना मात्र, अतिक्रमणांचा विळखा असून रस्त्याने पायी जाणाऱयांना हक्काचा पदपथ मिळणार का? असा प्रश्न पडत आहे.
शहरात महापालिकेने ठिकठिकाणी सायकल मार्ग तयार केला. आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील सायकल मार्गाचा वापर वाहने पार्क करण्यासाठी केला जात आहे. तर, शहरातील सर्वच पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेले सुनियोजित पदपथांना अतिक्रमणाचा विळशा पडत असून पादचाऱ्यांना मात्र, आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठिकठिकाणी प्रशस्त पदपथ बनविले आहेत. त्याच्याच शेजारी सायकल मार्ग बनविला आहे. पदपथाचा वापर त्याच्या शेजारच्या दुकानदारांनी आपले साहित्य ठेवण्यासाठी, येणाऱया ग्राहकांची वाहने पार्क करण्यासाठी होत आहे. तर, त्याच्या शेजारीच असलेल्या सायकल मार्गाचा वापर दुचाकी चालक तसेच इतर वाहन चालक करत आहेत. त्यामुळे पादचाऱयांनी त्या पुढील रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यातच अनेकदा अपघात घडत असून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या प्रशस्त पदपथ आणि सायकल मार्गाचा वापर संबंधितांसाठी होत नसल्याचे दिसून येते. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते आणि वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या पदपथांचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.
शहरात दापोडी ते पिंपरी, पिंपरी ते निगडी, टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक, बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक, डांगे चौक ते कस्तुरी चौक, शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक, सांगवी ते किवळे या मार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पदपथ उभारण्यात आलेले आहेत.
कारवाईचा फार्स
शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पदपथांवर विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. रावेत, वाकड परिसर विकसीत होत आहे. सुनियोजिश अशा प्रशस्त रस्त्याच्या कडेला असेल्लया प्रशस्त पदपथांवर ठिकाणी मोठ मोठी फर्निचर, खाद्यपदार्थ, फ्रूट स्टॉल्स, भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग कारवाई करते. गाडी पुढे जाताच तासाभरात रस्त्यावर पुन्हा विक्री सुरू होते. त्यामुळे महापालिका कारवाईचा नुसताच फार्स करते, असे स्पष्ट दिसून येते.