पिंपरी – आगामी काळात औद्योगिक पट्टयातील सोलर एजर्नी प्रकल्प, महावितरण, एमआयडीसी यांनी एकत्रितपणे प्रकल्प धोरण ठरवण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी उद्योजक आणि अधिकारी यांना केले. तसेच, हिवाळी अधिवेशनात सोलर प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या अनुदानासंदर्भात पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक सोलर प्लॅंटसाठी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे.
पिंपरी- चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याबाबत आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सोलर प्रोजेक्ट उभारणी आणि त्याला येणाऱ्या अडचणीवर काय पाठपुरावा करता येईल? यावर विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी पिंपरी- चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सुरेश म्हेत्रे, सचिव जयंत कड, नवनाथ वायाळ, संजय सातव, सचिन पाटील, योगेश लोंढे, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता संजीव राठोड, भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतूल देवकर, आकुर्डी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव, उप कार्यकारी अभियंता सागरे, सहाय्यक अभियंता दिवटे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उद्योजकांनी समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. या वेळी काही तातडीच्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या त्वरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. यामध्ये पेठ क्रमांक 7 व 10 साठी चार बे ब्रेकर बसवून त्यासाठी केबल देणे. त्यामुळे फिडर 1 व 2 वरील अतिरिक्त वीज भार कमी होईल. वारंवार वीज पुरवठा खंडित होणार आहे. कुदळवाडी चिखली औद्योगिक परिसर सध्या मोई फिडरवर असून, तो टाटा फिडरला जोडून देण्यात यावा. कारण मोई फिडर हा ग्रामीण विभागात येतो तसेच या फिडरवर दगडी क्रशर मशिन जास्त असल्यामुळे या फिडरवर वीज खंडित होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. भोसरी उपविभाग क्रमांक 2 चे विभाजन करून इंद्रायणीनगर शाखा कार्यालय व भोसरीगाव असे दोन विभाग करण्याच्या मागणीचा समावेश आहे.