पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)ने मोठा दणका दिला आहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती रद्द असून उपायुक्त स्मिता झगडे यांना शुक्रवारपासून दोन आठवड्यात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश मॅटने राज्य सरकारला दिले आहेत.
महापालिकेच्या उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करुन घेतले नाही. त्यानंतर राज्य शासनाने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन वसई-विरार महापालिकेचे उपायुक्तप्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जांभळे यांनी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मात्र, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला मॅटमध्ये आव्हान दिले होते. झगडे यांनी राज्य सरकार, प्रदीप जांभळे आणि महापालिका आयुक्त यांना या प्रकरणी प्रतिवादी केले होते.
सलग तीन दिवस सुनावणी
महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)चे सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांच्या खंडपीठापुढे त्याबाबत सुनावण्या झाल्या. 14 फेब्रुवारीपासून सलग तीन दिवस सुनावणी झाली. स्मिता झगडे यांच्या वतीने ऍड. अरविंद बांदिवडेकर यांनी युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली. उपायुक्त स्मिता झगडे यांना शुक्रवारपासून दोन आठवड्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश ए.पी. कुऱ्हेकर यांनी राज्य शासनाला दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाविरोधात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे पालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त पदाचा वाद आणखी शमणार नसल्याचे दिसून येत आहे. स्मिता झगडे म्हणाल्या, मॅटच्या निर्णयाचे स्वागत करते. न्याय प्रकिवेरील विश्वास वृद्धींगत झाला.
नैसर्गिक न्याय तत्वाचा भंग
नगरपरिषद प्रशासन सेवा महत्वाची आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त पदावर मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा पहिला हक्क आहे. स्मिता झगडे यांची नियुक्ती केली आणि ती रद्दही केली. त्यांच्या जागी जांभळे यांची नियुक्ती केली. त्यामुळे अर्जदाराला कोणतीही संधी दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे यात नैसर्गिक न्याय तत्वाचा भंग झालेले दिसून येत आहे. 17 डिसेंबर 2016 रोजी शासन निर्णयाने प्रतिनियुक्तीद्वारे महापालिकेत अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे यात पालन झाले नाही. नियुक्तीचे आदेश काढल्यानंतर महापालिका सेवेत जास्त कालावधी झाला होता, असे म्हणण्यास काही अर्थ राहत नसल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण मॅटने नोंदविले आहे.