पिंपरी – मिळकत कराची थकबाकी ठेवणा-या तब्बल दोन हजारहून अधिक मालमत्तांवर जप्तीची करवाई केल्यानंतर त्यातील सुमारे १८०० मिळकतधारकांनी थकीत कर जमा केला. कारवाईनंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १०९ मालमत्तांचा लिलाव काढला जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया कर आकारणी व कर संकलन विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून थकीत कर ठेवणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कर थकीत ठेवणऱ्या दोन हजारांहून अधिक मालमत्ता उजेडात आल्या. कराची थकबाकी भरण्यासाठी त्यांना नोटीस देऊन मुदत देण्यात आली. परंतु, त्यातील अनेकांनी मुदतीत थकीत कर भरलाच नाही. यामुळे कर आकारणी व कर संकलन विभागाने या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढले. या कारवाईमध्ये २००० हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. जप्तीची कारवाई केल्यानंतर वर्षभरात सुमारे १८०० मिळकत धारकांनी थकीत कर जमा करण्यास सुरुवात केली. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २३ कोटींचा कर जमा झाला. तर, एकूण ४ कोटी थकबाकी अजुनही वसूल होणे बाकी आहे.
अनेकवेळा नोटीस पाठवूनही उर्वरित मिळतकधारकांनी महापालिकेला प्रतिसाद दिला नाही. यामुळे जप्त केलेल्या १०९ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाकडून या मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मालमत्तांचे चालू बाजारभावानुसार मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांचा लिलाव काढण्यात येणार आहे. यामध्ये निवासी, बिगरनिवासी तसेच औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे. आयुक्तांनी ठरवून दिलेल्या धोरणातील नियमानुसार कारवाईची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले आहे.
मिळकत जप्त केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळेत कर जमा केला नाही. यातील १०९ मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळला नाही. यामुळे या मालमत्तांचा लिलाव काढण्यात येणार आहे. मालमत्ता मूल्यांकन ठरविल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार लिलाव प्रक्रिया पार पाडली जाईल.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त