नवी दिल्ली – बंडाचे निशाण फडकावलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यावर आज एका काँग्रेस आमदाराने घोडीबाजारीचा आरोप लगावला. ‘सचिन पायलट यांनी आपल्याला भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी ३५ कोटी देण्याची तयारी दर्शवली होती.’ असा आरोप करत आमदार गिरीराज सिंग मलिंगा यांनी आज खळबळ माजवली होती. आता या आरोपांना स्वतः सचिन पायलट यांनी उत्तर दिलं असून मलिंगा यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.
याबाबत बोलताना पायलट यांनी, “हे आरोप दुःखद आहेत मात्र आश्चर्यकारक नाहीत. मी घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्याविरोधात असे विखारी व खोटारड्यापणाचे आरोप लावण्यात येतील असं गृहीत धरलं होत. या आरोपांमागे मी काँग्रेसचा आमदार म्हणून राज्यातील काँग्रेस नेतृत्वविरोधात उभे केलेले प्रश्न दडपण्याचे कारस्थान आहे.” अशी भूमिका मांडली.
तत्पूर्वी, बसपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये सामील झालेले आमदार गिरीराज सिंग मलिंगा यांनी, “आपले सचिन पायलट यांच्याशी दोन-तीन वेळा बोलणे झाले असून त्यांनी मला भाजपमध्ये येण्यासाठी किती पैसे घेणार? असा थेट प्रश्न केला होता. त्यांनी ३५ करोड देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र मी त्यांना स्पष्टपणे नकार कळवला.” असा आरोप लगावला होता.
मलिंगा यांनी आपण याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील घडल्या प्रकारची माहिती दिल्याचा दावा केला होता.