शेवगाव : सध्या दूध दर कमालीचे कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्याला सावरण्यासाठी दूध दर वाढ करावी अन्यथा भारतीय जनता पक्षाला नाईलाजाने शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शेवगाव तालुका भाजपाच्या वतीने आज देण्यात आला .
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, सचिव भीमराज सागडे, महिला शहर अध्यक्ष उषा कंगणकर, अशोक आहुजा, नवनाथ फासाटे, बाळासाहेब महाडिक आदि पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार मयूर बेरड यांना फिजीकल डिस्टंसिंग ठेऊन निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, राज्यात दुधाला गेल्या 3 महिन्यापूर्वी मिळणारा प्रति लिटर ३४ रूपये दर आता २० रुपयांपेक्षा खाली आला आहे. तालुक्यातील अनेक तरूण बेरोजगारीवर मात करून दुध व्यवसायाकडे वळाले आहेत, त्यासाठी त्यांनी कर्ज काढले आहे, त्यातच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत, ५० किलोच्या पशुखाद्यासाठी शेतकऱ्यांना १२०० ते १५०० रूपये मोजावे लागतात. त्याचबरोबर चारा, औषध पाण्याच्या खर्चाचा ताळमेळ पाहता सध्या शेतकरी दुभत्या जनावरांचा खर्चही भागवू शकत नाहीत इतके दर कमी झाले आहेत.
आघाडी सरकारला शेतकरी व शेती प्रश्नांचे काहीही देणे – घेणे राहिलेले नाही. बांधावर खते देऊ म्हणणाऱ्या सरकारने पिकांना गरज असतांना युरिया दिला नाही. त्यामुळे बाजरी, तुरी सारखी पिके पिवळी पडली आहेत.
मागील भाजपा महायुतीच्या शासनाने प्रति लिटर ५ रूपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले होते. सध्या तर दुधाचे दर खूप खाली गेलेले असल्याने शेतकऱ्याला वाचविण्यासाठी सरकारने किमात प्रति लिटर १० रूपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा. अन्यथा शेतकरी उध्दस्त होईल.
शेतकरी उध्दवस्त होतांना भाजपा गप्प बसणार नाही. सरकारने तात्काळ दूधदर वाढ करावी अन्यथा १ ऑगस्ट रोजी भाजपा सर्व शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे .