क्रिकेट काॅर्नर (#IPL) : राजस्थानच्या यशात महाराष्ट्राच्या अनुजाचाही वाटा

-अमित डोंगरे

एकेकाळी क्रीडाक्षेत्रात महिलांचा सहभाग केवळ एक खेळाडू म्हणूनच होत होता. त्यांना त्या पलिकडे काहीही करता येत नव्हते. मात्र, जशा कक्षा रुंदावल्या तसे त्यांनाही मोठी मोठी व्यासपीठे मिळू लागली. असेच मोठे व्यासपीठ महाराष्ट्राची फिजिओ अनुजा दळवी पंडितलाही मिळाले आहे. अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत अनुजा राजस्थान रॉयल्सची प्रमुख फिजिओ म्हणून कार्यरत आहे. या स्पर्धेत कार्यरत असणारी अनुजा एकमेव महिला फिजिओ ठरली आहे.

तसेही पाहायला गेले तर क्रिकेट वर्तुळात अनुजाची चर्चा गेल्या काही वर्षांपूर्वीच रंगली होती. जेव्हा तिने बांगला देश क्रिकेट संघाशी फिजिओ म्हणून करार केला होता. त्यापूर्वीही तिला बीसीसीआयने अधिकृत फिजिओ म्हणून मान्यता दिली होती. त्याचवेळी तिची भारताच्या महिला संघाची फिजीओ म्हणूनही नियुक्ती झाली होती. अनुजाने आपला पती निरंजन पंडित याच्यासह यंदाच्या मोसमासाठी राजस्थानशी करार केला आहे. निरंजन देखील फिजिओथेरपिस्ट आहे तर अनुजा राजस्थानच्या खेळाडूंसाठी फिजिओ तसेच फिटनेस सल्लागार म्हणून जोडली गेली आहे.

निरंजनचे मुंबईत स्वतःचे फिजिओ केंद्र आहे. त्यातच अनुजाही कार्यरत असते. तिच्याकडून आजपर्यंत अनेक सेलीब्रीटींनीही उपचार घेत स्वतःची तंदुरुस्ती टीकवून ठेवली आहे. तिने मुंबईच्या केईएम वैद्यकीय महाविद्यालयातून फिजिओची पदवी घेतली असून त्यातीलच उच्च शिक्षण तिने ऑस्ट्रेलियातील ऍडलेड विद्यापीठात केले आहे. अनुजाने 2009 साली बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही फिजिओ पदावर काम केले. त्यानंतरच तीचे नाव क्रिकेट वर्तुळात चर्चिले गेले व तीला पहिली असाइनमेंट बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून मिळाली. तीचे तेथिल काम पाहूनच बीसीसीआयने तीची भारताच्या महिला क्रिकेट संघाची फिजिओ म्हणून नियुक्ती केली.

भारताच्या पुरूष क्रिकेट संघाशी जोडले गेलेल्या आशिष कौशिक, जॉन ग्लोस्टर व पॉल क्‍लोज यांच्यासह तिने काम केले व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिने अनेक क्रिकेट संघांची फिजिओ म्हणून आपली कामगिरी सिद्ध केली. तिचा मुख्य भर दुखापती टाळता कशा येतील याचे मार्गदर्शन करणे असले तरीही ती दुखापतीने त्रस्त खेळाडूंना पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठीचे व्यायाम, आहार यांसाठी सल्लागार म्हणून मदत करते. गेल्या वर्षी झालेल्या महिलांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत अनुजा बांगलादेश संघाशी जोडली गेली होती. त्यानंतर भारतात परतली तेव्हापासून देशातच नव्हे तर जगभरात करोनाचा धोका वाढला व तिच्या कामावरही त्याचा विपरित परिणाम झाला.

बांगलादेशच्या अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांच्याकडूनही तिचे कौतुक झाले होते. एक महिला ठरवले तर काय करु शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अनुजा दळवी पंडितने दाखवून दिले आहे. भारताच्या करोनाविरुद्धच्या कोवीड-19 टास्क फोर्समध्येही अनुजाचा समावेश आहे. क्रिकेट व्यतिरिक्तही अनुजाने अनेक खेळांतील खेळाडूंसाठी फिजिओ म्हणून काम केले आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाशीही ती जोडली गेली आहे. तसेच दिव्यांग क्रीडापटूंसाठी तर तिने स्वतःचेच केंद्र सुरु केले आहे. क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस नेमबाजी व जिम्नॅस्टिक्‍स या खेळांतील देशाचे प्रतिनिधीत्व करत असलेले खेळाडूदेखील तिच्याकडून तंदुरुस्ती टिकवण्यासाठी मार्गदर्शन घेत आहेत. गो स्पोर्टस या एनजीओच्या माध्यमातून ती केवळ मुंबईतीलच नाही तर संपूर्ण राज्यातील खेळाडूंसाठी कार्यरत असते.

आयपीएल स्पर्धेत राजस्थान संघासाठी कार्यरत असली तरी पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अनेक क्रीडापटूंची मार्गदर्शक म्हणूनही काम करणार आहे. अनुजाने हुशारी व तंत्रशुद्धता तसेच एक फिजिीओ म्हणून कर्तबगारी सिद्ध केली आहे. आता तिच्याच मार्गदर्शनामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ पूर्ण तंदुरुस्त आहे व स्पर्धेत चमकदार कामगिरीही करत आहे. महाराष्ट्राच्या मातितील या मुलीने स्काय इज द लिमिट हेच सिद्ध केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.