रोसेउ (डॉमिनिका) – भारतातील पंजाब नॅशनल बॅंकेला चुना लावून परदेशात फरार झालेला मेहुल चोक्सी याची तुरूंगातील छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. त्यात त्याचा डोळा सूजला असून त्याच्या हातावर जखमा झाल्याचेही दिसून येते आहे. आपले अपहरण करण्यात आले होते व साठ सत्तर जणांनी मारहाण केल्याचा दावा चोक्सीने केला असल्याचे त्याच्या वकीलाने म्हटले आहे.
भारतातून पसार झाल्यावर चोक्सीने अँटिग्वा बारबुडाचे नागरिकत्व घेतले आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेथून तो अचानक बेपत्ता झाला होता. मात्र तो डॉमिनिकात सापडला. त्यामुळे त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग आला आहे. आता स्थानिक माध्यमाने त्याचे गजाआड आणि जखमी दिसत असल्याचे छायाचित्र जारी केले आहे.
चोक्सीचे वकील वेनी मार्श यांनी दावा केला की चोक्सीचे अपहरण करून त्याला डॉमिनिका येथे नेण्यात आले होते व तेथे त्याला मारहाण करण्यात आली. त्याचा डोळा सूजला असून त्याच्या अंगावरही अनेक निशाण आहेत. अँटिग्वातील जॉली हार्बर येथून आपले अपहरण करण्यात आले होते व आपल्याला डॉमिनिका येथे एका जहाजावर मारहाण करण्यात आल्याचे चोक्सीने आपल्याला सांगितले असल्याचा दावा मार्श यांनी केला आहे. तसेच हे भारतीय आणि अँटिग्वाच्या पोलिसांचे कृत्य असल्याचेही त्याचे म्हणणे असल्याने मार्श म्हणाले.
दरम्यान, चोक्सीच्या या छायाचित्रांमुळे अँटिग्वा बारबुडात वाद निर्माण झाला आहे. सरकार हे प्रकरण चुकीच्या पध्दतीने हाताळत असल्याचा आरोप तेथील विरोधी पक्षांनी केला आहे. चोक्सी हे अँटिग्वाचे नागरिक असल्याने त्यांचे प्रत्यार्पण केले जाऊ शकत नाही, असे प्रमुख विरोधी पक्षनेते हेरॉल्ड लॉवेल यांनी म्हटले आहे.