पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात एकूण 286 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांचा आकडा तीनशेच्या खाली आल्याने काहीसे दिलासादायक चित्र आहे. तसेच 282 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच मंगळवारी 28 बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाच्या अहवालानुसार, दिवसभरात आढळलेल्या 286 करोनाबाधित रुग्णांमुळे आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 50 हजार 685 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 282 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 41 हजार 510 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत महापालिकेकडे 28 करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे 17 रुग्ण हे शहरातील नागरिक असून 11 रुग्ण शहराच्या हद्दीबाहेरील आहेत. आतपर्यंत शहरातील 4081 नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. शहरात सध्या रुग्णालयातील 2617 आणि गृह विलगीकरणातील 2477 असे एकूण 5094 करोनाबाधित रुग्ण उपचाराधीन आहेत.
दिवसभरात शहरातील महापालिकेच्या 35 केंद्रांवर 1472 नागरिकांचे तर दोन खासगी केंद्रांवर 493 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 45 वर्षांवरील 1011 तर 18 ते 44 वयोगटातील 487 नागरिकांचा व 467 हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे.
दिवसभरात शहरातील एकूण 3938 नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. याशिवाय कन्टेन्मेंट झोनमधील 1737 घरांना हेल्थ वर्कर्सनी 6206 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.कन्टेन्मेंट झोनची संख्या 1186 एवढी आहे.
जिल्हा रुग्णालयात 12 बाधित; एकाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 1) 12 बाधित रुग्ण आढळले. तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधित रुग्ण हे येरवडा, धानोरी, औंध, जुनी सांगवी, वेल्हा तालुका येथील रहिवाशी आहेत. त्यामध्ये 12 वर्षीय मुलासह 7 पुरुष आणि 5 महिला रुग्णांचा समावेश आहे. बेलवडी येथील 80 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना 16 तारखेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पिंपळे निलख-विनायक नगर येथील 36 वर्षीय महिला रुग्ण करोनामुक्त झाल्या. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 31 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 1 हजार 346 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 2053 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहे.