नवी दिल्ली : दिल्लीतील तिस हजारी कोर्टाच्या आवारात 2 नोव्हेंबर रोजी वकिलांबरोबर झालेल्या हाणामारीचा निषेध करण्यासाठी निदर्शने करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
या हाणामारीच्या निषेधार्थ आणि प्रशासनाच्या निषेधार्थ पोलिसांनी धरणे आंदोलन केले होते. या निदर्शनांनंतर सोशल मिडीयावर पोलिस अधिकाऱ्यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना असे निवेदन प्रसिद्धीस देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या या जनहित याचिकेची सुनावणी उद्या (शुक्रवारी) होणार आहे.
ऍड. राकेश कुमार लक्रा यांनी ही याचिका दाखल केली असून केंद्र सरकार, दिल्ली पोलिस, दिल्ली पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक, अरुणाचल प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक मधुर वर्मा, दिल्लीचे माजी पोलिस उपायुक्त अस्लम खान, “एनआयए’चे पोलिस अधिक्षक संजुक्ता प्रशार आणि पोलिस अधिकारी मेघना यादव या सर्वांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
हे धरणे आंदोलन करणारे, चिथावणीखोर घोषणाबाजी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सोशल मिडीयावर प्रक्षोभक निवेदन देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांचे हे धरणे आंदोलन त्यांच्या कर्तव्याच्या विपरीत आहे. हे आंदोलन करणारे अस्लम खान यांच्यावर कारवाई न होणे हे दिल्ली पोलिस आयुक्तालयाचे अपयश असल्याचा दावाही याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
साकेत कोर्टाबाहेर पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हजारो पोलिस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पोलिस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली होती.