पेठ -पेठ (ता. आंबेगाव) येथील करोना बाधित पहिले दोघे पतीपत्नी व आज उर्वरित चार करोना बाधित हे सर्व सहाही व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पेठ ग्रामस्थांची सुटकेचा निश्वास टाकला व आपले गाव करोनामुक्त झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
पेठ हे गाव आंबेगाव तालुक्याचे प्रवेशद्वार आहे. सातगाव पठार भागाची मुख्य बाजारपेठ आहे. आंबेगाव तालुक्यात मोजके कोरोना रुग्ण असताना पेठ येथे दोघे पतीपत्नी रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्याल आले. त्यानंतर पेठ येथे मुंबईहून गावाला आलेल्या चार व्यक्ती करोना बाधित निघाल्या. त्यामुळे पेठ गावात एकूण 6 रुग्ण पॉझिटिव्ह झाले होते. या सर्वांवर पुन्हा 14 दिवसांनी तपासणी केली असता सर्व 6 रुग्ण निगेटिव्ह आले.
त्यामुळे पेठ गाव कोरोना मुक्त झाले असले तरी कुटुंब सर्वेक्षण सुरू ठेवणार असल्याचे उपसरपंच अनिल सणस, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, अशोक राक्षे ग्रामसेवक चौगुले यांनी सांगितले. 12 जून पर्यंतचे लॉकडाऊन काहीसे शिथील कारण्यात आले आहे. पेठ परिसरात लॉकडाऊन काहीसे शिथील केले असले तरी लोकांनी सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क वापरावे. विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन तलाठी हेमंत भागवत यांनी केले आहे.