फलटण – तरडगाव, मिरेवाडी व तांबवे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे करोनाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
तरडगाव येथील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तिन्ही नातेवाइकांच्या अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिरेवाडीत एक कोव्हिड रुग्ण आढळला होता. त्याच्या कुटुंबातील चारही हाय रिस्क व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तांबवे येथील 15 हाय रिस्क व्यक्तींचे अहवालसुद्धा निगेटिव्ह आल्याची माहिती जगताप यांनी दिली.
फलटण तालुक्यात आजपर्यंत फक्त चार जण कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. तांबवेतील तरुणी दक्षिण कोरियात गेल्यानंतर करोनाबाधित झाल्याचे समजल्याने तांबवेकर धास्तावले होते. या कुटुंबातील सहा जणांना तातडीने फलटण येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. पुण्यात नोकरी करणाऱ्या मिरेवाडीतील 28 वर्षीय युवकाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.