पुणे – राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्या आमदार-खासदारांनी सतत पक्षांतरे करू नयेत. लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण एकमेकांशी शत्रुत्व नसावे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी केले. ”राजकीय कारकीर्द घडवू इच्छिणार्या युवा विद्यार्थ्यांसमोर पक्षबदलाचे, गोंधळाचे, घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता, एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणे समोर ठेवावीत, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. १० ते १२ जानेवारी दरम्यान कोथरूड येथे भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वक्ते व लेखक प्रा. रामचरण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी, यू. टी. खादेर फरीद, उत्तर प्रदेशचे सतीश महाना, मध्य प्रदेशचे गिरीश गौतम यांच्यासह एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी उपस्थित होते.
राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी सतत पक्षबदल केले, की सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या कामातील रस संपतो. जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडणे, हे धोक्याचे आहे. सत्ताधारी गटाच्या चुकीच्या, अयोग्य धोरणांना, कृतींना विरोधकांनी अवश्य विरोध करावा, लोकशाहीने ती ताकद प्रत्येकाला दिली आहे. पण याचा अर्थ असा नव्हे, की विरोधकांनी गदारोळ, घोषणाबाजी करून संसदेच्या कामकाजात सतत अडथळे निर्माण करावेत. त्यांनी विरोधक असावे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनू नये. कोणत्याही परिस्थितीत संसदेचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे वैंकय्या नायडू यांनी सांगितले.
… अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे
युवा पिढीला भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, परंपरा यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. जागतिक तुलनेत भारतीय संस्कृतीचे वेगळेपण देशाच्या तरुण पिढीने जाणून घेतले पाहिजे. नव्या तंत्रक्रांतीच्या युगात भारत विश्वगुरू या संज्ञेला पात्र ठरत आहे, याचा अभिमान बाळगला पाहिजे. परंपरा आणि नव्या युगामध्ये एकाच वेळी वावरताना जी संभ्रमावस्था दिसत आहे, त्यातून मार्ग दाखवण्यासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे, असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले. यावेळी राहुल कराड यांचा छात्र संसद उपक्रम यशस्वी करत असल्याबद्दल मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.