गावात कचरा टाकत असल्याने ग्रामपंचायतीने शिकवला धडा
सोमाटणे – वारंवार सांगूनही गावाच्या हद्दीत कचरा आणून टाकणाऱ्या हौसिंग सोसायट्यांना धडा शिकवत सोमाटणे ग्रामपंचायतीने आगळे-वेगळे कचरा आंदोलन केले. एरव्ही संतप्त नागरिक ग्रामपंचायत किंवा पालिकेच्या समोर नेऊन कचरा टाकतात. परंतु येथे सोमाटणे ग्रामपंचायतीनेच आंदोलनाचा पवित्रा घेत गावाच्या हद्दीच्या बाहेर असणाऱ्या आणि गावात कचरा आणून टाकणाऱ्या सोसायट्यांच्या प्रवेशद्वारात कचऱ्याची गाडी रिकामी केली.
शिरगाव येथील अभिमान सोसायटीतील कचरा सोमाटणे गावाच्या हद्दीत टाकला जातो. अशा प्रकारे कचरा टाकू नये. कचऱ्याची आपल्या सोसायाटीतच व्यवस्था करावी, अशा वारंवार सूचना वर्षभरापासून देण्यात येत होत्या.
परंतु याकडे सोसायटीतील नागरिकांनी दुर्लक्ष करत घरातील कचरा हा पोत्यात भरून गाडीवरून नेत सोमाटणे हद्दीत टाकला जात असे. या घटनेचे सोमाटणे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी फोटो व व्हिडीओ शूटींग केले आहे. हा कचरा टाकू नये यासाठी वारंवार सांगून देखील दखल न घेतल्याने हा कचरा भरून अभिमान सोसायटीच्या गेट समोर खाली करून वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्यात आले.
वर्गीकरण न करताच टाकतात कचरा
शिरगाव येथील सोसायटीतील लोक कचऱ्याचे वर्गीकरण न करताच कचरा सोमाटणे हद्दीत टाकत असल्याने हा कचरा वेगळा करताना व उचलताना खूप त्रास होत आहे. तसेच दुसऱ्या गावाच्या हद्दीतील कचरा आम्ही का उचलायचा असा सवाल देखील सरपंच गोकुळ गायकवाड, राकेश मुऱ्हे, प्रवीण गुलाब मुऱ्हे, पंडित दिवसे, प्रवीण रामभाऊ मुऱ्हे, आनंद सांडभोर आदींनी केला आहे.
शिरगाव येथील अभिमान सोसायटीतील रहिवाशी असलेले नागरिकांनी आपल्या कचऱ्याची सोय सोसायटीतच करावी. इतरत्र कोठेही कचरा टाकू नये. यापुढे देखील असा प्रकार चालू राहिल्यास कचरा गेट समोर न टाकता सोसायटीत टाकला जाईल. – राकेश मुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य.