पावसामुळे कारखान्यांची धुराडी पेटेनात

जिल्ह्यातील अकरा कारखान्यांसमोर गळितासाठी उसाचाही प्रश्‍न “आ वासून’

पुणे – विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. मात्र, वादळी पावसाने यंदा कारखान्यांचे धुराडे हे अजून तीन आठवडे पेटणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा गळीत हंगामावर ऊस टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. महापूर, दुष्काळ, रोगराईचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे राज्यातील कारखान्यांच्या गाळप हंगामाचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. विधानसभा निवडणुका, गाळप हंगाम, त्यानंतर जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार असल्यामुळे कारखान्यांच्या कारभाऱ्यांना आता गाळप आणि निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरील मोर्चेबांधणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

निवडणूक होणाऱ्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पत्र देऊन सहकारी साखर कारखाने आणि संस्थांच्या प्राथमिक मतदारयाद्या सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नवीन वर्षांत साखर पट्टा निवडणुकीने गजबजणार आहे.

जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्‍यातील ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील सुमारे तेरा सहकारी साखर कारखाने आणि तीन ते चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत सहकार कारखानदारीसमोर खासगी कारखान्यांनी स्पर्धा केली आहे. त्यामुळे सहकाराखालोखाल खासगी कारखान्यांनी गाळपाचा टप्पा गाठला आहे. सहकार कारखानदारी सध्या मंदीच्या संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यात यंदा राज्यात ऊस टंचाईचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे गाळपावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेची समीकरणे लागू?
जिल्ह्यात अकरा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक येत्या वर्षात जाहीर होणार आहे. ऊस पट्टा असलेल्या बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यात राष्ट्रवादीने प्राबल्य निर्माण केले आहे. यातील अनेक कारखाने राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून राजकीय समीकरणे आणि बेरजेचे राजकारण करून एकहाती जिल्ह्यात वर्चस्व केले आहे. त्यामुळे विधानसभेची समीकरण कारखान्यांच्या निवडणुकीत लागू होणार आहे.

या कारखान्यांचे वाजणार बिगूल
2020 मध्ये नीरा-भीमा सहकार साखर कारखाना इंदापूर, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर, संत तुकाराम साखर कारखाना मुळशी, माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती, सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना बारामती, राजगड सहकारी साखर कारखाना, भोर, कर्मयोगी शंकररावजी कारखाना, इंदापूर, छत्रपती साखर कारखाना, इंदापूर, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखाना, शिरूर, भीमा सहकारी साखर कारखाना, दौंड, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, आंबेगाव या कारखान्यांचे निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे.

कारभाऱ्यांची दमछाक होणार
जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांची निवडणुका या मार्च ते जून 2020 या कालावधीत जाहीर होणार आहेत. त्यामुळे गाळप हंगाम संपल्यानंतर कारखान्यांच्या कारभाऱ्यांना निवडणुकांचे वेध लागणार आहे. त्यासाठी सभासदांना रास्त दर देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच यंदा उसाचे क्षेत्र घटल्यामुळे परजिल्ह्यातून उसाची पळवापळवी होणार आहे. त्यात तोडणी यंत्रणा आणि गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ, अधिकाऱ्यांची दमछाक होणार आहे. यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने हे जेमतेम तीन ते चार महिनेच चालणार आहेत. त्यामुळे उसाचा प्रश्‍न ज्वलंत झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.