कमालच झाली! करोनारोधक लस न घेतलेल्या व्यक्तींनाही आले आभाराचे मेसेज

‘को-विन ऍप'च्या बिघाडामुळे आणखी एक प्रताप

पुणे  – लसीकरणासाठी लाभार्थींची यादी तयार करून एका छत्राखाली त्याचा कारभार करण्यासाठी तयार केलेल्या “को-विन ऍप’मुळे झालेला आणखी एक प्रताप (बिघाड) समोर आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही अशा व्यक्तींनाही “लस घेतल्याबद्दल आभार’ असे मेसेज गेले आहेत.

 

 

लसीकरणाची मोहीम दि.16 जानेवारीला सुरू झाली. आधी दोनवेळा “ड्रायरन’ होऊनही “को-विन ऍप’ शुक्रवारी बंद पडले. त्यामुळे लिस्टमधील लाभार्थींना मेसेजेस गेलेच नव्हते. पहिल्याच दिवशी मोहिमेला “खो’ बसायला नको म्हणून ऐनवेळी जे उपलब्ध होते त्यांना “ब्रॅंड अँबेसिडर’ असे नाव चिकटवून “सेलिब्रेटी’ बनवण्यात आले. यातील अनेक डॉक्टर्स आणि “हेल्थकेअर वर्कर्स’ हे त्या रुग्णालयात काम करणारेच होते. त्यामुळे ते लगेचच उपलब्धही होऊ शकले.

 

 

लसीकरणानंतर, लिस्टमध्ये ज्यांची नावे होती, त्यांना “आभारा’चे मेसेज “को-विन ऍप’ वरून गेल्याचे दिसून आले आहे. एका दाम्पत्याला लस देण्यासाठी पहिल्याच दिवशी “सेलिब्रेटी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले. त्यांच्या नावाची नोंदणी वास्तविक रुबी हॉल येथे असल्याचे त्यांच्या मेसेजवरून दिसून येते. त्यातील पुरुष लाभार्थीला कमला नेहरू रुग्णालयात लस देण्यात आली, तर त्यांच्या पत्नीला लस देण्यात आली नाही. पतीचेच नाव “सेलिब्रेटी’मध्ये घेण्यात आले.

 

 

त्यानंतर पुरुष लाभार्थीला कमला नेहरू रुग्णालयात लस दिल्यानंतर त्यांना आभाराचा मेसेज को-विन ऍप वरून आला. मात्र, त्यात “तुम्हांला रुबी हॉल क्लिनिकमध्ये लस दिली असून,’ सोबत लस टोचणाऱ्या परिचारिकेचे नाव मेसेजमध्ये नोंदवण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर पत्नीला लस न देताही त्यांना आभाराचा मेसेज आल्याने त्या दोघांना आश्चर्याचा धक्काच बसला.

 

 

“कोविन ऍप’मध्ये झालेला बिघाड आणि त्यानंतर झालेली दुरुस्ती या सगळ्यामुळे असे मेसेजेस गेल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

या दाम्पत्याला लस मिळणार का?

एखाद्याने लस नाकारली (रिफ्युज) तरच त्याचे नाव लिस्टमधून काढले जाऊ शकते. तसेच लस घेतली तरच त्याचे नाव लिस्टमधून वगळण्यात येते. या प्रकरणात संबंधित लाभार्थींने लसच घेतली नसताना त्यांचे आभार मानले गेले आहेत. त्यामुळे लिस्टमध्ये त्यांचे नाव राहिले आहे, की नाही? किंवा त्यांना लस मिळणार की नाही, याविषयीचा प्रश्न अनुत्तरीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.