मेलबर्न – ऑस्ट्रेलियात सिडनी आणि मेलबर्नमध्ये लॉकडाऊनविरोधी रॅलीला हिंसक वळण लागल्याने 200 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनला विरोध करणारे नागरीक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला आहे. नागरिकांकडून लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याला विरोध केला जात असला तरी सरकारने किमान 10 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे वृत्त आहे.
ऑस्ट्रेलियात लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध करण्यासाठी सुमारे 4 हजार नागरिकांनी मेलबर्नमध्ये रॅली काढली होती. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षानंतर 200 जणांना अटक करण्यात आली आहे.
या संघर्षानंतर 6 पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका आंदोलकाला प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले. हे निदर्शक हिंसा करण्याच्या उद्देशानेच रस्त्यावर उतरले होते, असे पोलिसांनी सांगितले.
सिडनीमध्येही अशाप्रकारे रॅली काढणाऱ्या 47 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 261 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सिडनी शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. तर ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियात सरकारने 70-80 टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र तरिही काही निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. सध्या 29 टक्के जणांचेच लसीकरण झाले आहे.