काबुल – तालिबानकडून जरी उदारमतवादी धोरणाची हमी दिली जात असली तरी तालिबानी क्रौर्याच्या काही घटना घडत आहेत. खराब स्वयंपाकामुळे एका महिलेला पेटवल्याची घटना अलिकडेच घडली आहे. तालिबानपासून वाचण्यासाठी अमेरिकेत पळून गेलेल्या नजला आयोबी या महिलेने ही माहिती दिली.
तालिबानी दहशतवाद्यांसाठी केलेले पदार्थ खराब असल्याच्या कारणास्तव एका महिलेला पेटवण्यात आले होते. ही घटना अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात घडली, असे आयोबी यांनी सांगितल्याचे वृत्त एका संकेतस्थळाच्या वृत्तात म्हटले आहे.
अन्य तरुण महिलांना लैंगिक गुलामगिरीसाठी शेजारील देशांमध्ये पाठवून दिले जात असल्याचेही या महिलेने सांगितले आहे. तरुण मुलींना बळजवरीने तालिबानींबरोबर निकाह करण्यास भाग पाडले जात आहे.
आणखीन एका वृत्तानुसार तालिबान्यांनी एका ख्रिश्चन व्चक्तीची कातडी सोलून काढली आणि त्याला ट्रॅफिक सिग्नलला फासावर लटकवण्यात आले आहे. अमेरिकेचे माजी संसद सदस्य मार्क वॉकर यांनी या घटनेचा दावा केला आहे.