होर्मुझ: भाजी बनवताना ती चवदार होण्यासाठी लोक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतात.मसाल्यांनी भाजी खूप चविष्ट होते. दुसरीकडे, जगात एक असेही ठिकाण आहे जिथे लोक भाज्यांमध्ये मसाल्यांऐवजी चक्क मातीचा वापर करतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. ही बातमी वाचून प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल की कोणी भाजीत मसाल्याऐवजी माती टाकून ती कशी खाऊ शकतात ? मात्र, याचे कारण जाणून घेतल्यास तुम्हालाही भाज्या खाण्याचा मोह होईल! चला, जाणून घेऊया सविस्तर.
आशिया खंडात असलेला देश इराणमधील एक बेट आहे. त्याचे नाव होर्मुझ बेट आहे. इथले लोक जेवणात मसाल्यांऐवजी मातीचा वापर करतात. वास्तविक इथली माती खूप चविष्ट आहे. याशिवाय येथील माती अतिशय आरोग्यदायी आहे. या कारणास्तव लोक त्यांच्या अन्नात मसाला म्हणून मातीचा वापर करतात. सुंदर पर्वतांमुळे होर्मुझ बेट जगभर प्रसिद्ध आहे. या पर्वतांची रंगीबेरंगी माती अतिशय खास आहे.
येथील रंगीबेरंगी मातीमुळे हे बेट ‘रेनबो आयलंड’ म्हणून ओळखले जाते. या डोंगराची माती खाण्यासच चविष्ट नाही तर दिसायलाही खूप सुंदर आहे. ही माती इथले लोक भाजीत टाकतातच, पण इथे येणारे पर्यटकदेखील ही माती कच्चीच खातात. हे अतिशय सुंदर बेट पर्शियन गल्फमध्ये आहे. येथील माती खनिजांनी समृद्ध आहे. एका अहवालानुसार या पर्वतांच्या मातीत सुमारे ७० प्रकारची खनिजे आढळतात.
ब्रिटनचे भूवैज्ञानिक संशोधन प्रमुख आणि भूवैज्ञानिक डॉ. कॅथरीन गुडनफ म्हणतात की लाखो वर्षांपूर्वी पर्शियन खाडीजवळील उथळ समुद्रात मिठाचा जाड थर गोठला होता. त्यामुळे बेटाची माती अतिशय सुंदर झाली. पर्वत चिकणमाती, शेल आणि लोखंडाच्या थरांनी झाकलेले आहेत. यामुळे ते खूप रंगीत दिसते.