- आमदार जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या करोनाचा धोका वाढला आहे, यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी नागरिकांना केले आहे.
एकमेकांचे विरोध म्हणून ओळखल्या जात असणाऱ्या या दोन्ही बड्या पक्षांच्या नेत्यांनी एकाच प्रकारचे आवाहन वेगवेगळ्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. त्यामुळे आता करोनाबाबत नागरिकांनी अधिक सावधान राहण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. तो नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले सध्या करोनावर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. मात्र मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे तसेच तपासण्या न करणे अशा प्रकारांमुळे शहरात करोनाचा संसर्ग पुन्हा उचल खाऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच अनेकांना करोना संसर्ग संपल्यासारखे वाटते. त्यामुळे मास्क न घालता फिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. घराबाहेर जाऊन खरेदी तसेच गर्दी केल्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. शहरातील डॉक्टरांकडे ताप, सर्दी, तीव्र डोकेदुखी तसेच अंगदुखी ही लक्षणे घेऊन आलेल्या रुग्णांचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी सतर्क होण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्वीइतकीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
करोनाविरोधात लढाईसाठी महापालिकेची वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. परंतु, नागरिक म्हणून सर्व पिंपरी-चिंचवडकरांचीही त्यांना साथ मिळणे ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. दिवाळीचा उत्सव साजरा करून नागरिक फिरायला, नातेवाइकांना भेटायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
आपल्या सर्वांसाठी आगामी एक ते दीड महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, बाजारात, दुकानात, मॉलमध्ये गर्दी करणे टाळा, घराबाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नका, घरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.