पॅरिस :– कीटक प्रकारात मोडत असलेल्या मात्र, अत्यंत त्रासदायक असलेल्या ढेकणांचा त्रास भारतीयांना नवा नाही. मात्र, आता याच ढेकणांचा(bedbug) धसका पॅरिस ऑलिम्पिकच्या #Paris2024 आयोजकांसह त्यांच्या सरकारनेही घेतला आहे. स्पर्धेची तयारी एकीकडे सुरू असताना तयार होत असलेल्या क्रीडाग्राम तसेच वाहतूक सेवा पुरवत असलेल्या वाहनांमध्येही या ढेकणांची संख्या अफाट असून त्यात वाढही होत आहे.
पॅरिसमधील स्थानिक बस व मेट्रो वाहतुकीदरम्यान अनेक प्रवाशांना त्यांच्या सीटमध्ये ढेकणे आढळ्याने आतापर्यंत शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापासून नऊ महिन्यांनी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी जवळपास 12 ते 15 हजार खेळाडू व लाखोंच्या संख्येने क्रीडाप्रेमी दाखल होतील असा अंदाज आहे. त्यामुळे या ढेकणांचा योग्य वेळी पेस्ट कंट्रोल करून बंदोबस्त केला नाही तर स्पर्धेदरम्यान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल त्यामुळे नाहक देशाची बदनामीही होईल, अशी भीती आयोजकांना बसली आहे.
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी देशाच्या ऑलिम्पिक संघटनेसह आरोग्य मंत्रालयाचीही एक बैठक बोलावली असून या ढेकणांचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. खरेतर 2017 सालापासून देशात आरोग्य खात्यांकडे शेकडो तक्रारी आल्या असून वेळोवेळी उपाय करूनही हा त्रास कमी झालेला नाही.
अनेकांनी घेतला धसका…
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, क्रीडाप्रेमी विविध हॉटेल्समध्येच राहणार असून पॅरिसमधील जवळपास प्रत्येक हॉटेल चालकांनी या ढेकणांचा धसका घेतला आहे. इतकेच नव्हे तर या नागरिकांना विविध सेवा पुरवणारे व्यावसायीकही चिंतेत आहेत. लॉंड्री चालक, तयार कपड्यांचे व्यापारी, टॅक्सी, बस तसेच मेट्रो या वाहतूक व्यवस्थांनीही या त्रासापासून कशी सुटका करून घ्यायची असा सवाल केला आहे. स्थानिक नगरपालिका या ढेकणांचा बंदोबस्त करण्यासाठी सरसावली असून स्पर्धेपूर्वीच हा त्रास कायमचा नष्ट करू, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.