मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक आरोप करण्यात आला आहे.
क्रिकेट सट्टेबाज सोनू जालानने हे आरोप केले आहेत. सोनूने स्वतः गुन्हे अन्वेषण विभागकडे जाऊन आपला जबाब नोंदवला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे नोंदवलेल्या जबाबानुसार, एखाद्या मोठ्या प्रकरणात जर अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना 10 कोटी रुपये दे, असे परमबीर सिंग यांनी मला सांगितले होते.
या प्रकरणी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा या दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. जालानने परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सध्या सीआयडी चौकशी करत आहे.
आपल्या निवदेनात जालान याने सीआयडी अधिकाऱ्यांना सांगितले की, मे 2018 मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे नेण्यात आले होते.
यानंतर सिंग यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांची माहिती विचारली. तसेच मला कुटुंबियातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर प्रदीप शर्मा यांना 10 कोटी देण्यास सांगितल्याचा जबाब जालानने नोंदविला आहे.