पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटीची रोकड जप्त

पुणे –  शहर पोलिसांनी रविवारी संयुक्त  कारवाई करून  दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना अटक केली.  त्यांच्याकडून रोख तब्बल एक  कोटी रुपये  रोकड जप्त केली  आहे. सट्टाकिंग गणेश भिवराज  भुतडा  (वय ४८, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रास्ता पेठ ) आणि अशोक भवरलाल जैन उर्फ देहूरोडकर ( वय ४८, रा. मार्केटयार्ड )  ही या दोघांची नावे आहेत.  या कारवाईमुळे शहरालगतच्या बुकींनी रातोरात काढता पाय घेतला.

भुतडा व जैन  क्रिकेट सामान्यावर सट्टा घेणारे मोठे बुकी म्हणून ओळखले जातात. सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांवर ते मोठी उलाढाल जगभरातून करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे अन्वेषण विभाग व सामाजिक सुरक्षा शाखेतील पथकांनी एकाचवेळी छापेमारी करून ही कारवाई केली.

या दोघांकडून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली. भुतडा आणि जैन  यांच्याकडील डायर्‍या, मोबाईल आणि इतर काही कागदपत्रे  पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. समर्थ व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईची चाहूल लागताच पिंपरी  चिंचवड,  लोणावळा आणि मुंबईतील काही मोठे बुक्की परागंदा झाल्याची चर्चा आहे.  सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली  याप्रकरणाचा तपास जारी करण्यात आला आहे.

“शहरातील सर्व कायदेबाह्य गोष्टींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दल  प्रयत्नशील आहे. सट्टेबाजीची माहिती समजताच वेळ न दवडता आम्ही तत्काळ कारवाई केली. या प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.”
– पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.