मुंबई – जळगावमध्ये भाजपला शिवसेनेने आणखी एक मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे भाजपचे गटनेते पियुष महाजन यांच्यासह 6 नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी हाती शिवबंधन बांधले आहे. हे सर्वच्या सर्व 6 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला मोठ खिंडार पडले असल्याचे मानले जात आहे.
मुक्ताई नगरपालिकेचे 6 नगरसेवक हे गुलाबराव पाटील यांच्यासह वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या 6 नगरसेवकांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे तब्बल 30 नगरसेवक आपल्या गळाला लावले. भाजपला हा एक मोठा झटका बसला होता. हे नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत गेल्याने फुटीर नगरसेवकांना व्हीप न बाजवता आल्याने भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने भाजपची ही याचिका फेटाळून लावली होती.
जळगावच्या या घटनेतून भाजप सावरत असतानाच आता मुक्ताई नगरपालिकेचे 6 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मुक्ताई नगरपालिकाही भाजपच्या हातातून जाणार असे चित्र निर्माण झाले आहे.