अहमदाबाद – गुजरात किनाऱ्यालगत सोमवारी सकाळी नऊ नाविकांसह एक पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली. त्या नौकेतून 280 कोटी रूपयांचा हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ती संयुक्त कारवाई केली.
एटीएसने दिलेल्या माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने विशेष मोहीम हाती घेऊन एक जहाज समुद्रात पाठवले. जहाजावरील पथकाने एक पाकिस्तानी नौका भारतीय सागरी हद्दीत शिरल्याचे पाहिले.
थांबण्याचा इशारा दिल्यावर पाकिस्तानी नौका वेगाने पुढे जाऊ लागली. त्यामुळे तटरक्षक दलाकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये पाकिस्तानी नौकेतील दोन ते तीन नाविक किरकोळ जखमी झाले. काही अंतरापर्यंत पाठलाग करून तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी नौकेला रोखले. नाविकांसह ती नौका ताब्यात घेऊन किनाऱ्यावर आणण्यात आली.