लक्षवेधी: पाकिस्तानने भारतधोरण बदलण्याची गरज

सत्यवान सुरळकर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथग्रहणवेळी इम्रान खान यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. पाकिस्तानने आपला भारतविषयक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. या दोन देशांमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने भारतातील दहशतवाद आणि हिंसाचार थांबवायला हवा त्याशिवाय या उभय राष्ट्रांच्या संबंधात फार मोठे बदल होणे अपेक्षित नाही.

भारतातील सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्‌विट करून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले तसेच फोनवरूनही शुभेच्छा दिल्या. ही केवळ औपचारिकता समजावी. याअगोदर इम्रान खान यांनी म्हटले होते की, प्रदेशात शांती, समृद्धी आणि प्रगतीसाठी हिंसा आणि दहशतवादापासून मुक्‍त होण्याची गरज आहे. या विधानावरून पाकिस्तानचे पंतप्रधानांना शांतीपूर्ण वातावरण मान्य असल्याचे लक्षात येते. तसेच त्यांचा दृष्टिकोनातही बदल झालेला दिसतो.

14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील हा पहिलाच संवाद आहे. या हल्ल्यानंतर भारतानेही प्रतिहल्ला करून बालाकोट येथील दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त केले होते. यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. यानंतर भारताच्या दबावामुळे चीनने जैशच्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्‍त राष्ट्र सुरक्षा परिषदेला मान्यता दिली. भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा रोख स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले थांबवत नाही तोपर्यंत भारताकडून मैत्रीचा हात पुढे केला जाणार नाही. 21 आणि 22 मे ला किरगिस्तान येथीेल बिश्‍केक येथे झालेल्या शांघाई सहयोग संघटना (एससीओ) या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या विमानाला आपल्या वायुसीमेवरून जाण्यासाठी पाकिस्तानने मुभा दिली. यामागे सौजन्याचा भाग आहेच. मात्र, दोन्ही देशांतील ताण थोडसा हलका होण्यासाठी नक्‍कीच चांगला आहे. कारण बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना आपले वायूक्षेत्र बंद केले होते. यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

पुढील महिन्यात एससीओच्या बिश्‍केक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इम्रान खान यांच्यासोबत भेट होऊ शकते. ही चालून आलेली संधी असेल दोन्ही देशांना संबंध सुधारण्यासाठी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतलेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या इम्रान खानला हे ठरवावे लागेल की भारतासोबत संबंध सुधारायचे की नाही?
आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज आणि इतर राष्ट्रांचा पाकिस्तानवर असलेला दबाव अशा वादळातून सध्या पाकिस्तान जातोय. त्यामुळे पाकिस्तानातील जनता इम्रान खानवर नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानचे पंतप्रधानपदी येऊन उणेपुरे नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे सत्ता राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.

सत्ता हातात घेताना इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते की, ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)कडून कोणत्याही परिस्थितीत मदत घेणार नाहीत. मात्र, सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी डबघायला आली आहे की इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे भाग पडले. या कर्जातून पाकिस्तान चीन आणि इतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड करेल. त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक सावट तसेच राहण्याची शक्‍यता दिसते. अशा परिस्थितीत पाकिस्तानने भारताकडे स्वतःहून मैत्रीचा हात पुढे करायला हवा आणि त्यासाठी अगोदर भारतातील दहशतवादी हल्ले आणि हिंसाचार बंद करायला हवा.

पाकिस्तानला पहिल्या वर्षी 19 अब्ज कर्ज चुकवायचे आहे. त्यामुळे पाकिस्तान जनतेचे जीवन हलाखीचे होऊ शकते. अशावेळी इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला सबुरीचा सल्ला दिला आहे. 18 जून रोजी पाकिस्तानचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आयएमएफने घातलेल्या अनेक जाचक अटी पाहता हा अर्थसंकल्प तयार करणे म्हणजे इम्रान खान सरकारची अग्निपरीक्षाच ठरणार आहे. त्यातच अर्थमंत्री, स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर आणि संघ राजस्व बोर्डचे अध्यक्ष यांना पदावरून दूर केल्याने या संस्थांवरील विश्‍वास कमी झाला आहे.

याअगोदर इम्रान खान यांनी आपल्या मंत्रिमंडळात अनेक बदल केले होते. ज्यांच्याकडून एक खाते चालवता आले नाही त्यांना दुसरे खाते देण्यात आले. मात्र, यानंतरही कामकाजात काहीही फरक पडलेला नाही. यामुळे पाकिस्तानी जनतेचा इम्रान खान यांच्याविषयी अपेक्षाभंग होताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये अशा लोकांची कमी नाही की, त्यांचे असे मानणे आहे की, आपला देश राष्ट्रपती शासनाकडे झुकतो आहे. पाकिस्तानात मध्यावधी निवडणुकीचीही चर्चा सुरू आहे. इम्रान खान यांना जर आपले सरकार वाचवायचे असेल तर त्वरित आर्थिक संकटातून बाहेर पडून जनतेला दिलासा द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर विकसित राष्ट्राकडे झेप घेणाऱ्या भारतासोबतही संबंध सुधारावे लागतील.

भारत सार्क संघटनेतील महत्त्वाचे राष्ट्र आहे. भारताने अनेकवेळा किंबहुना दरवर्षीच भुटान, नेपाळ यांराष्ट्रांना आर्थिक मदत केलेली आहे. पाकिस्तानही भारताचे मित्र राष्ट्र बनल्यास भारत पाकिस्तानला आर्थिकरूपी चक्रीवादळातून बाहेर काढू शकतो. त्यासाठी पाकिस्तानने भारतविषयी आपले धोरण बदलणे गरजेचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here