Pakistan Election | पाकिस्तानमधील निवडणूक गैरप्रकारांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि देशाच्या सरन्यायाधीशांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप देशातील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने केला आहे.
या गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा देखील देऊन टाकला आहे. रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत अली चठ्ठा यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करून माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आजपासून देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली असतानाच त्यांनी हा आरोप केला आहे. ( Pakistan Election)
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि सरन्यायाधीश देखील या गैरप्रकारामध्ये सहभागी आहेत. या गैरप्रकाराची पूर्ण जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा देत आहोत, असे चठ्ठा यांनी म्हटले आहे.
देशाचा विश्वासघात केल्यामुळे आपल्याला झोप येत नाही. या गुन्हयाबद्दल आपल्याला शिक्षा व्हायला हवी. जे या गुन्ह्यामध्ये सहभागी आहोत, त्यांनाही शिक्षा व्हायला हवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे मनस्ताप झाल्याने आत्महत्या करण्याचा विचारही चठ्ठा यांच्या मनात आला होता. मात्र त्याऐवजी हा प्रकार लोकांसमोर आणण्याचे ठरवले. या राजकारण्यांसाठी काहीही चुकीचे करू नये, अशी सूचना देखील त्यांनी देशातील प्रशासकीय वर्गाला केली आहे.
चठ्ठा यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, तरी देखील या आरोपांची तपासणी केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
तत्पूर्वी, पंजाबचे काळजीवाहू माहिती मंत्री अमीर मीर यांनीही निवडणूक निकालांमध्ये फेरफार केल्याचा चठ्ठा यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे.